[1] हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
[2] पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
[3] तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”
[4] कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
[5] पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
[6] सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
[7] खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
[8] तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत. आमचे गुप्त पाप तुझ्या प्रकाशाच्या समक्ष ठेवले आहे.
[9] तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते; आमची वर्षे उसाशाप्रमाणे त्वरेने संपून जातात.
[10] आमचे आयुष्य सत्तर वर्षे आहे; किंवा जर आम्ही निरोगी असलो तर ऐंशी वर्षे आहे; पण तरी आमच्या आयुष्यातील उत्तम वर्षे समस्या आणि दु:ख यांच्या निशाणीने भरलेले आहे. होय, ते लवकर सरते आणि आम्ही दूर उडून जातो.
[11] तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे; तुझी भिती बाळगण्याइतका तुझा क्रोध कोण जाणतो?
[12] म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे मोजण्यास शिकव की आम्ही ज्ञानाने जगण्यास शिकू.
[13] हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील? तुझ्या सेवकावर दया कर.
[14] तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्षाने आणि आनंदाने घालवू.
[15] जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने आणि जितकी वर्षे आम्ही समस्येचा अनुभव घेतला त्या वर्षाच्या मानाने आम्हांला आनंदित कर.
[16] तुझी कृती तुझ्या सेवकांना, तुझे वैभव त्यांच्या मुलांना बघू दे.
[17] प्रभू, आमचा देव याची कृपा आम्हांवर असो. आमच्या हातच्या कामाला उन्नती दे; खरोखर, आमच्या हातच्या कामाला उन्नती दे.