[1] हे परमेश्वरा, मला दुष्टांपासून सोडव; जुलमी मनुष्यापासून मला सुरक्षित ठेव.
[2] ते आपल्या मनात वाईट योजना करतात; ते प्रत्येक दिवशी भांडणाला सुरुवात करतात.
[3] त्यांची जीभ सर्पासारखी जखम करते; त्यांच्या ओठाखाली विषारी सर्पाचे विष आहे.
[4] हे परमेश्वरा, मला दुष्टांच्या हातातून वाचव; मला जुलमी मनुष्यांपासून सुरक्षित ठेव. त्यांनी मला ढकलण्याची योजना केली आहे.
[5] गर्विष्ठांनी माझ्यासाठी पाश व दोऱ्या लपवून ठेविल्या आहेत; त्यांनी रस्त्याच्या बाजूला जाळे पसरले आहे; त्यांनी माझ्यासाठी सापळा लावला आहे.
[6] मी परमेश्वरास म्हणतो, तू माझा देव आहेस; हे परमेश्वरा, माझ्या विनवण्यांच्या वाणीकडे कान दे.
[7] हे परमेश्वरा, माझ्या प्रभू, माझ्या तारणसामर्थ्या, माझ्या लढाईच्या दिवसात तू माझे शिरस्राण आहेस.
[8] हे परमेश्वरा, दुष्टांच्या इच्छा पुरवू नको, त्यांच्या दुष्ट योजना यशस्वी होऊ देऊ नकोस. नाही तर ते उन्मत्त होतील.
[9] ज्यांनी मला घेरले आहे; त्यांच्या ओठापासून होणारा अनर्थ त्यांच्याच शिरी पडो.
[10] त्यांच्यावर जळते निखारे पडोत; त्यांना अग्नीत टाकले जावो, ज्यातून त्यांना उठून वर कधीही येता येणार नाही अशा खड्यात फेकण्यात येवो.
[11] वाईट बोलणारा पृथ्वीवर सुरक्षित केला जाणार नाही; जुलमी मनुष्याच्या पाठीस अरिष्ट एकसारखे लागेल.
[12] परमेश्वर गरीबांच्या पक्षाचे, आणि गरजवंताच्या वादाचे समर्थन करील हे मला माहित आहे.
[13] खचित नितीमान तुझ्या नावाची उपकारस्तुती करतील; सरळ मनाचे तुझ्या समक्षतेत राहतील.