[1] हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान लाव, आणि माझ्या विणवनीपासून लपू नकोस.
[2] देवा, माझ्याकडे लक्ष लाव आणि मला उत्तर दे माझ्या संकटात मला विसावा नाही.
[3] माझ्या शत्रूंच्या आवाजामुळे, दुष्टाच्या जुलूमामुळे मी कण्हत आहे, कारण ते माझ्यावर संकट आणतात, आणि द्वेषात माझा पाठलाग करतात.
[4] माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
[5] भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे.
[6] मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
[7] मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.
[8] वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
[9] प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
[10] दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
[11] दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
[12] कारण जर माझ्या शत्रूंनी मला दोष लावला असता तर तर मला कळून आले असते, किंवा माझा द्वेष करणारा जो माझ्याविरूद्ध उठला असता, तर मी स्वतःला त्याजपासून लपवले असते.
[13] परंतु मला संकटात टाकणारा तू आहेस, माझा मित्र, माझा साथीदार, माझा दोस्त.
[14] एकमेकांसोबत आपली गोड सहभागिता होती. आपण समुदायांबरोबर चालत देवाच्या घरात जात होतो.
[15] मृत्यू त्यांच्यावर अकस्मात येवो. जीवंतपणी ते मृतलोकांत खाली जावोत. कारण त्यांच्या जगण्यात दुष्टपण आहे.
[16] मी तर देवाला हाक मारीन, आणि परमेश्वर मला तारील.
[17] मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपले गाऱ्हाणे करेन आणि कण्हेन. आणि तो माझी वाणी ऐकेल.
[18] माझ्याविरूद्ध लढाणाऱ्यांपासून त्याने मला खंडूण, माझा जीव शांततेत ठेवला आहे. कारण माझ्याविरूद्ध लढणारे पुष्कळ होते.
[19] देव, जो पुरातन काळापासून आहे, तो ऐकणार आणि त्यांना प्रतिसाद देणार, (सेला) ते मनुष्ये बदलत नाहीत; ती देवाला भीत नाहीत.
[20] माझ्या मित्रांनी त्याच्या सोबत शांतीने राहणाऱ्यांवर आपला हात उगारला आहे. त्याने आपला करार मोडला आहे.
[21] त्यांचे तोंड लोण्यासारखे आहे, परंतू त्याचे हृदय शत्रुत्व करणारेच आहे. त्यांचे शब्द तेलापेक्षा बुळ्बुळीतआहेत, तरी ते बाहेर काढलेल्या तलवारी सारखे आहे.
[22] तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुला आधार देईल. तो नितीमानाला कधी पडू देणार नाही.
[23] परंतू हे देवा, तू त्यांना नाशाच्या खांचेत पाडून टाकशील; घातकी आणि कपटी मनुष्ये आपले अर्धे आयुष्यही जगणार नाहीत, परंतू मी तुझ्यावर विश्वास ठेवीन.