Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:44

[1] परमेश्वरास धन्यवाद द्या, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

[2] इस्राएलाने आता म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”

[3] अहरोनाच्या घराण्याने म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”

[4] परमेश्वराची उपासना करणाऱ्यांनी म्हणावे, “त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.”

[5] मी संकटात असता परमेश्वरास हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.

[6] परमेश्वर माझ्याबरोबर आहे; मी घाबरणार नाही; मनुष्य माझे काय करू शकेल?

[7] माझे सहाय्य करणारा परमेश्वर माझ्या बाजूला आहे; माझा द्वेष करणाऱ्यावर विजय झालेला मी बघेन.

[8] मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराच्या आश्रयास जाणे अधिक चांगले आहे.

[9] मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा परमेश्वरास शरण जाणे हे अधिक चांगले आहे.

[10] सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे; परमेश्वराच्या नावात मी त्यांचा संहार करीन.

[11] त्यांनी मला घेरले आहे; होय, त्यांनी मला घेरले आहे. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.

[12] त्यांनी मला मधमाश्याप्रमाणे घेरले आहे; जशी काट्यांमध्ये जेवढ्या लवकर आग लागते तेवढ्याच लवकर ते नाहीसे होतील. परमेश्वराच्या नावात मी त्यांना नाहीसे करीन.

[13] मी पडावे म्हणून त्यांनी माझ्यावर हल्ला केला, परंतु परमेश्वराने मला मदत केली.

[14] परमेश्वर माझे सामर्थ्य आणि आनंद आहे. आणि तो माझे तारण झाला आहे.

[15] उत्सवाचा आणि तारणाचा शब्द नितीमानाच्या तंबूत ऐकू येत आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.

[16] परमेश्वराचा उजवा हात उंचावला आहे; परमेश्वराचा उजवा हात विजय मिळवतो.

[17] मी मरणार नाही, पण जगेन आणि परमेश्वराची कृत्ये जाहीर करीन.

[18] परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.

[19] माझ्यासाठी धार्मिकतेचे दरवाजे उघडा; मी त्यामध्ये प्रवेश करीन आणि मी परमेश्वरास धन्यवाद देईन.

[20] हे परमेश्वराचे दार आहे; नितीमान त्यातून प्रवेश करतील.

[21] मी तुला धन्यवाद देईन, कारण तू मला उत्तर दिले आहे आणि तू माझे तारण झाला आहेस.

[22] इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला होता, तोच कोनाशिला झाला आहे.

[23] परमेश्वराने हे केले आहे; आमच्या दृष्टीने ते अतिशय अद्भुत आहे.

[24] परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे; ह्यात आपण आनंद व उल्लास करू.

[25] हे परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, आता आमचे तारण कर; हे परमेश्वरा आम्ही तुला विनंती करतो, आता आमचा उत्कर्ष कर.

[26] परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित असो; परमेश्वराच्या घरातून आम्ही तुला आशीर्वाद देतो.

[27] परमेश्वर देव आहे. त्याने आपल्याला प्रकाश दिला आहे; यज्ञाचा पशू वेदीच्या शिंगास दोरीने बांधा.

[28] तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देईन. तू माझा देव आहेस; मी तुला उंचावीन.

[29] अहो, तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या; कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

स्तोत्रसंहिता — Chapters