[1] परमेश्वरास धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. आणि त्याची कराराची विश्वसनियता सर्वकाळ टिकणारी आहे.
[2] परमेश्वराने उद्धारलेले, ज्यांना खंडणी भरून त्याने शत्रूच्या अधिकारातून सोडवले आहे,
[3] त्याने त्यांना परक्या देशातून पूर्व व पश्चिम, उत्तर व दक्षिण या दिशातून एकवट केले आहे.
[4] ते रानात वैराण प्रदेशातील रस्त्याने भटकले; आणि त्यांना राहण्यास नगर सापडले नाही.
[5] ते खूप भुकेले आणि तान्हेले होते; आणि ते थकव्याने मूर्च्छित झाले.
[6] नंतर त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना त्यांच्या विपत्तीतून सोडवले.
[7] त्याने त्यांना सरळ मार्गाने नेले यासाठी की, त्या नगरात त्यांना वस्त्ती करावी
[8] अहा, परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि आश्चर्यकारक गोष्टी त्याने मनुष्यजातीसाठी केल्या त्याबद्दल लोक त्याचा धन्यवाद करोत.
[9] कारण त्याने तान्हेल्या जिवास तृप्त केले, आणि भुकेल्या जिवाला उत्तम पदार्थांनी भरले.
[10] काही कैदी क्लेशाने आणि साखळ्यांनी जखडलेले असता; काळोखात आणि मरणाच्या छायेत बसले आहेत.
[11] त्यांनी देवाच्या वचनाविरुध्द बंड केले, आणि त्यांनी परात्पराचे शिक्षण नापसंत केले.
[12] त्यांने त्यांचे हृदय कष्टाद्वारे नम्र केले; ते अडखळून पडले आणि त्यांना मदत करायला तेथे कोणीही नव्हता.
[13] तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली आणि त्याने त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणले.
[14] देवाने त्यांना अंधारातून आणि मरणाच्या छायेतून बाहेर आणले, आणि त्यांची बंधणे तोडली.
[15] परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
[16] कारण त्याने पितळेची दारे तोडली, आणि लोखंडाचे गज तोडून टाकले.
[17] आपल्या बंडखोरीच्या मार्गात ते मूर्ख होते, आणि आपल्या पापामुळे ते पीडिले होते.
[18] सर्व उत्तम अन्न खाण्याची इच्छा त्यांना होईना आणि ते मरणाच्या दाराजवळ ओढले गेले.
[19] तेव्हा त्यांनी आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारली, आणि त्याने त्यांना क्लेशातून बाहेर आणले.
[20] त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
[21] परमेश्वराच्या कराराची विश्वसनियता व त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
[22] ते त्यास आभाररुपी यज्ञ अर्पण करोत, आणि गाण्यात त्याची कृत्ये जाहीर करोत.
[23] काही जहाजातून समुद्र प्रवास करतात, आणि महासागरापार व्यवसाय करतात.
[24] ते परमेश्वराची कृत्ये पाहतात, आणि त्याची अद्भुत कृत्ये समुद्रावर पाहतात.
[25] कारण तो आज्ञा करतो आणि वादळ उठवितो; तेव्हा समुद्र खवळतो.
[26] लाटा आकाशापर्यंत वर पोहचतात, मग त्या खाली खोल तळाकडे जातात. मनुष्याचे धैर्य धोक्यामुळे गळून जाते.
[27] ते मद्याप्यासारखे डुलतात आणि झोकांड्या खातात, आणि त्यांची बुद्धी गुंग होते.
[28] तेव्हा ते आपल्या संकटात परमेश्वरास हाक मारतात, आणि तो त्यांना त्यांच्या क्लेशातून बाहेर आणून वाचवतो.
[29] तो वादळ शांत करतो, आणि लाटांना स्तब्ध करतो.
[30] समुद्र शांत झाल्यामुळे ते आनंद करतात, तो त्यांना त्यांच्या इच्छित बंदरास आणतो.
[31] परमेश्वरास त्याच्या कराराची विश्वसनियता आणि त्याने मनुष्यजातीसाठी केलेल्या आश्चर्यकारक गोष्टींबद्दल लोक त्याचे उपकारस्मरण करोत.
[32] लोकांच्या मंडळीत तो उंचविला जावो आणि वडिलांच्या सभेत त्याची स्तुती होवो.
[33] तो नद्यांना रान करतो, पाण्याच्या झऱ्यांची कोरडी भूमी करतो,
[34] आणि फलदायी जमिनीची नापीक जमिन करतो. कारण तेथील राहणाऱ्या वाईट लोकांमुळे.
[35] तो वाळवंटाचे पाण्याचे तळे करतो, आणि कोरडी भूमीतून पाण्याचे झरे करतो.
[36] तेथे भुकेल्यास वसवतो, आणि त्यामध्ये राहण्यासाठी नगर बांधतो.
[37] ते नगरे बांधतात त्यामध्ये शेते पेरतात, द्राक्षमळे लावतात, आणि विपुल पिके काढतात.
[38] तो त्यास आशीर्वाद देतो आणि त्यांची खूप वाढ होते, तो त्यांच्या गुरांना कमी होऊ देत नाही.
[39] नंतर यातनामयी अरिष्ट आणि दुःख यांमुळे ते कमी होतात आणि नष्ट होतात.
[40] तो शत्रूंच्या अधिपतीवर अपमान ओततो, आणि त्यांना रस्ते नसलेल्या रानातून भटकायला लावतो.
[41] पण तो गरजवंताना क्लेशापासून सुरक्षित ठेवतो, आणि त्यांच्या कुटुंबांची कळपासारखी काळजी घेतो.
[42] सरळ मनाचे हे पाहतात आणि आनंदी होतात, आणि सर्व दुष्ट आपले तोंड बंद करतात.
[43] जो कोणी ज्ञानी आहे त्याने ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे आणि परमेश्वराच्या कराराच्या विश्वसनीयतेच्या कृतीवर मनन करावे.