[1] हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस?
[2] कारण दुष्ट आपल्या गर्विष्ठपणामुळे पीडलेल्यांचा पाठलाग करतो, परंतु कृपया असे होवो की दुष्टांनी जे संकल्प योजिले आहेत, त्यामध्ये ते सापडो.
[3] कारण दुष्ट आपल्या हृदयाच्या इच्छेचा अभिमान बाळगतो; दुष्ट लोभी व्यक्तीस धन्य म्हणतो व परमेश्वरास तुच्छ मानतो आणि नाकारतो.
[4] दुष्ट मनुष्य गर्विष्ठ असतो, ह्यास्तव तो देवाला शोधत नाही. कारण देवाबद्दल त्यास काही काळजी नाही, म्हणून तो देवाचा विचार करत नाही.
[5] त्याचे मार्ग उन्नतीचे असतात, परंतु तुझे धार्मिक नियम त्याच्या आवाक्याबाहेरचे आहेत, तो आपल्या सर्व शत्रूंवर फुत्कारतो.
[6] तो आपल्या हृदयात असे म्हणतो, मी कधीच चुकणार नाही; संपूर्ण पिढ्यांत माझ्यावर आपत्ती येणारच नाही.
[7] त्याचे मुख शाप, कपट, जुलूम, हानिकारक शब्दांनी भरलेले आहेत. त्यांची जीभ जखमी व नाश करते.
[8] तो गावाजवळ टपून बसतो, गुप्त ठिकाणात तो निर्दोष्याला ठार मारतो; त्याचे डोळे लाचारावर टपून असतात.
[9] जसा सिंह गर्द झाडात लपतो, तसाच तो दडून बसतो. तो दीनाला धरायला टपून बसतो. तो दीनाला आपल्या जाळ्यात ओढून धरून घेतो.
[10] त्याचे बळी पडणारे ठेचले आणि झोडले जातात. ते त्याच्या बळकट जाळ्यात पडतात.
[11] तो आपल्या हृदयात असे बोलतो, देव आपल्याला विसरला आहे, त्याने आपले मुख झाकले आहे, तो पाहण्याचा त्रास करून घेणार नाही.
[12] हे परमेश्वरा, देवा, ऊठ! तू आपला हात न्यायासाठी चालव. गरीबांना विसरु नकोस.
[13] दुष्ट देवाला तुच्छ का मानतो? तो मला जबाबदार धरणार नाही, असे तो मनात का म्हणतो?
[14] तू ते पाहिले आहे, कारण तू आपल्या हाती ते घ्यावे म्हणून तू उपद्रव आणि दु:ख पाहतो, लाचार तुला आपणास सोपवून देतो, तू अनाथांचा वाचवणारा आहे.
[15] दुष्ट आणि वाईट मनुष्याचा भुज तोडून टाक, त्याच्या वाईट कृत्यांबद्दल त्यास जबाबदार धर, ज्याने असा विचार केला होता की तू ते शोधणार नाही.
[16] परमेश्वर सदासर्वकाळ राजा आहे, राष्ट्रे त्याच्या भूमीतून बाहेर घालवली आहेत.
[17] हे परमेश्वरा, पीडितांचे तू ऐकले आहे; तू त्यांचे हृदय सामर्थ्यवान केले आहे, तू त्यांची प्रार्थना ऐकली आहे.
[18] पोरके आणि पीडलेले यांचे तू रक्षण केले आहे, म्हणजे मनुष्य पृथ्वीवर आणखी भयाचे कारण होऊ नये.