[1] हे परमेश्वरा, तुझ्यामध्ये मी आश्रय धरिला आहे, कधीच माझी निराशा होऊ देऊ नकोस. तुझ्या न्यायात मला वाचव.
[2] माझे ऐक, त्वरीत मला वाचव, माझ्या आश्रयाचा खडक हो. माझा तारणारा बळकट दुर्ग असा हो.
[3] कारण तू माझा खडक आणि माझा दुर्ग आहेस, तर तुझ्या नामास्तव मला मार्गदर्शन कर आणि मला चालव.
[4] त्यांनी गुप्तपणे रचलेल्या सापळ्यातून तू मला उपटून बाहेर काढ. कारण तू माझा आश्रय आहे.
[5] मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, हे परमेश्वरा, सत्याच्या देवा, तू मला खंडून घेतले आहे.
[6] जे निरुपयोगी मूर्तींची सेवा करतात, त्यांचा मी तिरस्कार करतो. परंतु मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो.
[7] तुझ्या प्रेमदयेमध्ये मी आनंद आणि हर्ष करीन, कारण तू माझे दु:ख पाहिले आहेस.
[8] तू मला माझ्या शत्रूंच्या हाती सोपवून दिले नाहीस. तू माझा पाय खुल्या विस्तीर्ण जागेत स्थिर केला आहे.
[9] परमेश्वरा, माझ्यावर दया कर, कारण मी दु:खात आहे. माझे डोळे, माझा जीव, माझ्या देहासह क्षीण झाला आहे.
[10] कारण माझे आयुष्य दु:खात आणि कण्हण्यात माझी वर्षे गेली आहेत. माझ्या पापांमुळे माझी शक्ती क्षीण झाली आहेत, आणि माझी हाडे झिजली आहेत.
[11] माझ्या शत्रूंमुळे लोक माझा तिरस्कार करतात माझ्या शेजाऱ्यास माझी परिस्थिती भयावह आहे, आणि जे मला ओखळतात त्यांना मी भय असा झालो आहे.
[12] मृत पावलेल्या मनुष्यासारखा मी झालो आहे, ज्याची कोणी आठवण करत नाही. मी फुटलेल्या भांड्यासारखा झालो आहे.
[13] कारण पुष्कळांनी केलीली निंदा मी ऐकली आहे, प्रत्येक बाजूनी भयावह बातमी आहे, ते माझ्याविरुध्द कट करत आहेत.
[14] परंतु परमेश्वरा माझा तुझ्यावर विश्वास आहे. तूच माझा देव आहेस, असे मी म्हणतो.
[15] माझे वेळ तुझ्या हातात आहे. मला माझ्या शत्रूंच्या आणि जे माझा पाठलाग करतात त्यांच्या हातातून सोडव.
[16] तुझ्या सेवकावर तुझ्या मुखाचा प्रकाश चमकू दे. तुझ्या प्रेमदयेत मला तार.
[17] परमेश्वरा, मला निराश होऊ देऊ नकोस, कारण मी तुला हाक मारतो, दुष्ट निराश केला जावो, मृतलोकांत तो निःशब्द होवो.
[18] खोटे बोलणारे ओठ शांत केले जावोत, जसे ते नितीमानांच्याविरूद्ध असत्य आणि तिरस्काराने उद्धटपणे बोलतात.
[19] जे तुझा आदर बाळगतात त्यांच्यासाठी तू आपला थोर चांगूलपणा जपून ठेवला आहे, जे तुझ्यामध्ये आश्रय घेतात त्यांच्याकरिता तू सर्व मानवजाती समोर घडवून आणतोस.
[20] त्यांना आपल्या उपस्थितीच्या आश्रयात तू मनुष्याच्या कटापासून लपवशील. हिंसक जीभेपासून तू त्यांना मंडपात लपवशील.
[21] परमेश्वर धन्यवादित असो! कारण त्याने बळकट नगरात आपली आश्चर्यकारक प्रेमदया दाखवली आहे.
[22] मी घाईत म्हणालो, मी तुझ्या नजरेसमोरून छेदून टाकलो आहे, तरी तू माझी मदतीची विनंती ऐकली, जेव्हा मी तुझ्याकडे आरोळी केली.
[23] अहो सर्व परमेश्वराच्या मागे चालणाऱ्यांनो, त्याच्यावर प्रीती करा. कारण परमेश्वर विश्वासू लोकांचे रक्षण करतो. परंतु तो गर्विष्ठ्यांची परत फेड करतो.
[24] जे तुम्ही परमेश्वरावर विश्वास करता, बलवान व धैर्यवान व्हा.