Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:12

[1] माझ्या देवा, हे राजा, मी तुझी खूप स्तुती करीन; मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचा धन्यवाद करीन.

[2] प्रत्येक दिवशी मी तुझा धन्यवाद करीन. मी सदासर्वकाळ व कायम तुझ्या नावाचे स्तवन करीन.

[3] परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे; त्याची महानता अनाकलनीय आहे.

[4] एक पिढी दुसऱ्या पिढीपुढे तुझ्या कृत्यांची प्रशंसा करीत राहील, आणि तुझ्या पराक्रमी कृतीचे वर्णन करतील.

[5] ते तुझ्या राजवैभवाचा गौरवयुक्त प्रतापाविषयी बोलतील, मी तुझ्या अद्भुत कार्यांचे मनन करीन.

[6] ते तुझ्या भयावह कृत्यांच्या पराक्रमाविषयी बोलतील, मी तुझ्या महिमेचे वर्णन करीन.

[7] ते तुझ्या विपुल अशा चांगुलपणाविषयी सांगतील, आणि तुझ्या न्यायीपणाबद्दल गाणे गातील.

[8] परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे, तो मंदक्रोध व अतिदयाळू आहे.

[9] परमेश्वर सर्वांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.

[10] हे परमेश्वरा, तू केलेली सर्व कृत्ये तुला धन्यवाद देतील; तुझे भक्त तुला धन्यवाद देतील.

[11] ते तुझ्या राज्याच्या गौरवाविषयी सांगतील, आणि तुझ्या सामर्थ्याविषयी बोलतील.

[12] हे यासाठी की, त्यांनी देवाची पराक्रमी कृत्ये आणि त्याच्या राज्याचे वैभवयुक्त ऐश्वर्य ही मानवजातीस कळवावी.

[13] तुझे राज्य युगानुयुग राहणारे राज्य आहे. आणि तुझा राज्याधिकार पिढ्यानपिढ्या टिकणारा आहे.

[14] पडत असलेल्या सर्वांना परमेश्वर आधार देतो, आणि वाकलेल्या सर्वांना तो उभे करतो.

[15] सर्वांचे डोळे तुझ्याकडे लागतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस.

[16] तू आपला हात उघडून प्रत्येक जिवंत प्राण्याची इच्छा तृप्त करतो.

[17] परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे; आणि तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे.

[18] जे कोणी त्याचा धावा करतात, जे सत्यतेने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे.

[19] तो त्याचे भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; तो त्यांची आरोळी ऐकून त्यांना वाचवतो.

[20] परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. परंतु तो वाईटांचा नाश करतो.

[21] माझे मुख परमेश्वराची स्तुती करील. सर्व मानवजात त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद सदासर्वकाळ व कायम करो.

स्तोत्रसंहिता — Chapters