Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:31

[1] थोर परमेश्वर देव, बोलला आहे. आणि पृथ्वीला तिच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत हाक मारली.

[2] सौंदर्य परिपूर्णता सियोनेमधून देव प्रकाशला आहे.

[3] आमचा देव येईल आणि तो शांत राहणार नाही, त्याच्यासमोर आग नाश करत चालली आहे, आणि त्याच्याभोवती वादळ घोंगावत आहे.

[4] त्याने वर आकाशाला आणि पृथ्वीला हाक मारली, म्हणजे तो त्याच्या लोकांचा न्यायनिवाडा करील.

[5] देव म्हणतो, “माझ्या भक्तांनो माझ्याभोवती गोळा व्हा. ज्यांनी यज्ञाच्या व्दारे माझ्याशी करार केला आहे.”

[6] आकाश त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असते. कारण देव स्वतः न्यायधीश आहे.

[7] हे माझ्या लोकांनो, ऐका, आणि मी बोलेन, मी देव आहे, तुमचा देव आहे.

[8] मी तुमच्या होमार्पणाबद्दल तक्रार करीत नाही. तुमची होमार्पणे निरंतर माझ्यापुढे आहेत,

[9] मी तुमच्या गोठ्यातून बैल घेणार नाही. किंवा मी तुमच्या मेंढवाड्यातून बोकड घेणार नाही.

[10] कारण जंगलातील प्रत्येक पशू माझा आहे, हजारो पर्वतावरील सर्व प्राणी माझ्याच मालकीचे आहेत.

[11] उंच पर्वतावरील प्रत्येक पक्षी मला माहित आहे आणि भूमीवरील वन्य पशू माझे आहेत.

[12] मी भुकेला असलो तरी तुला बोलणार नाही, कारण जग माझेच आहे, आणि त्यातील सर्वकाही माझेच आहे.

[13] मी बैलाचे मांस खाणार का? मी बकऱ्यांचे रक्त पिणार का?

[14] देवाला उपकार स्तुतीचा यज्ञ अर्पण कर, आणि परत्पराकडे आपले नवस फेड.

[15] तू संकटात असता मला हाक मार, आणि मी तुला वाचवेन, आणि तू मला गौरव देशील.

[16] देव दुष्ट लोकांस म्हणतो, तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलण्याचे काय काम आहे? आणि तू माझा करार तुझ्या तोंडाने उच्चरणारा आहेस?

[17] कारण तू शिक्षेचा तिरस्कार करतोस, आणि माझी वचने झुगारून देतोस?

[18] तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.

[19] तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.

[20] तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.

[21] तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.

[22] तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.

[23] जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.

स्तोत्रसंहिता — Chapters