[1] अहो पृथ्वीवरील सर्वजणहो देवाचा जयजयकार करा;
[2] त्याच्या नावाचा महिमा गा; त्याची स्तुती गौरवशाली होईल अशी करा.
[3] देवाला म्हणा, तुझी कृत्ये किती भीतिदायक आहेत, तुझ्या महान सामर्थ्यामुळे तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन होतात.
[4] सर्व पृथ्वी तुझी आराधना करतील; आणि तुझी स्तोत्रे गातील; ते तुझ्या नावाची स्तोत्रे गातील.
[5] अहो या, आणि देवाची कार्ये पहा; तो मनुष्यांच्या मुलांस आपल्या कृत्यांनी धाक बसवतो.
[6] त्याने समुद्र पालटून कोरडी भूमी केली; ते नदीतून पायांनी चालत गेले; तेथे आम्ही त्याच्यात आनंद केला.
[7] तो आपल्या सामर्थ्याने सर्वकाळ राज्य करतो; तो आपल्या डोळ्यांनी सर्व राष्ट्रांचे निरीक्षण करतो; बंडखोरांनी आपल्यास उंच करू नये.
[8] अहो लोकांनो, आमच्या देवाला धन्यवाद द्या, आणि त्याची स्तुती ऐकू येईल अशी करा.
[9] तो आमचा जीव राखून ठेवतो, आणि तो आमचे पाय सरकू देत नाही.
[10] कारण हे देवा, तू आमची परीक्षा केली आहे; रुप्याची परीक्षा करतात तशी तू आमची परीक्षा केली आहे.
[11] तू आम्हास जाळ्यात आणले; तू आमच्या कमरेवर अवजड ओझे ठेवले.
[12] तू आमच्या डोक्यावरून लोकांस स्वारी करण्यास लावले. आम्ही अग्नीतून आणि पाण्यातून गेलो, परंतु तू आम्हास बाहेर काढून प्रशस्त जागी आणले.
[13] मी होमार्पणे घेऊन तुझ्या घरात येईन; मी तुला केलेले नवस फेडीन.
[14] संकटात असता जे मी आपल्या ओठांनी उच्चारले आणि जे मी आपल्या तोंडाने बोलल,
[15] मी तुला मेंढ्याच्या धूपासहित पुष्ट पशूंचे होमार्पणे मी तुला अर्पीण; बोकड आणि गोऱ्हे अर्पीण.
[16] जे सर्व तुम्ही देवाचे भय धरता, या आणि ऐका, आणि त्याने माझ्यासाठी काय केले ते मी तुम्हास सांगतो.
[17] मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, आणि माझ्या जीभेवर त्याची स्तुती होती.
[18] जर माझ्या मनात अन्यायाकडे मी पाहिले असते, तर प्रभूने माझे ऐकले नसते.
[19] पण देवाने खचित ऐकले आहे; त्याने माझ्या प्रार्थनेच्या वाणीकडे लक्ष दिले आहे.
[20] देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझ्या प्रार्थनांपासून आपले मुख फिरविले नाही, किंवा त्याच्या कराराच्या विश्वासूपणापासून आपली दृष्टी वळविली नाही.