[1] मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
[2] मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.
[3] मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
[4] हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
[5] खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
[6] कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
[7] जरी मी संकटांमध्ये चाललो तरी तू मला सुरक्षित ठेवतोस. माझ्या शत्रूंच्या क्रोधावर तू आपला हात चालवितोस; आणि तुझा उजवा हात माझे तारण करतो.
[8] परमेश्वर माझ्याबरोबर शेवटपर्यंत आहे; हे परमेश्वरा, तुझी कराराची विश्वासयोग्यता सदासर्वकाळ आहे. तू आपल्या हातची कामे सोडून देऊ नकोस.