Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:19

[1] परमेश्वराची स्तुती करा. हे माझ्या जिवा, परमेश्वराची स्तुती कर.

[2] मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत परमेश्वराची स्तुती करीन. मला अस्तित्व आहे तोपर्यंत मी माझ्या देवाची स्तवने गाईन.

[3] अधिपतींवर किंवा ज्याच्याठायी तारण नाही, अशा त्या मनुष्यजातीवर भरवसा ठेवू नका.

[4] जेव्हा त्याचा श्वास थांबतो, तो मातीस परत जातो; त्यादिवशी त्याच्या योजनेचाही शेवट होतो.

[5] ज्याच्या मदतीला याकोबाचा देव आहे, ज्याची आशा आपला देव परमेश्वर यावर आहे, तो आशीर्वादित आहे.

[6] परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले, तो सदासर्वकाळ आपले सत्य पाळतो.

[7] तो जाचलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, आणि तो भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानास मुक्त करतो.

[8] परमेश्वर आंधळ्यांचे डोळे उघडतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो. परमेश्वर नितीमान लोकांवर प्रेम करतो.

[9] परमेश्वर आपल्या देशात परक्यांचे रक्षण करतो. तो पितृहीनांना व विधवा यांना आधार देतो. परंतु तो वाईटांचा विरोध करतो.

[10] परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सीयोने, तुझा देव पिढ्यानपिढ्या राज्य करीतो. परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता — Chapters