[1] हे परमेश्वरा, मी तुला उंच करीन, कारण तू मला उठून उभे केले आहेस आणि माझ्या शत्रूंना माझ्यावर हर्ष करू दिला नाहीस.
[2] हे परमेश्वरा, मी तुला मदतीस हाक मारली आणि तू मला बरे केले.
[3] हे परमेश्वरा तू माझ्या जीवाला मृतलोकांतून वर काढून आणलेस. मी खाचेत उतरू नये, म्हणून तू मला जिवंत राखले आहे.
[4] जे तुम्ही विश्वासयोग्य आहा, ते तुम्ही परमेश्वरास स्तुती गा. त्याची पवित्रता स्मरून त्याच्या नावाला धन्यवाद द्या.
[5] कारण त्याचा राग काही क्षणाचा आहे, परंतु त्याचा अनुग्रह आयुष्यभर आहे. रडने कदाचीत रात्रभर असेल, परंतु सकाळी हर्ष होईलच.
[6] मी आत्मविश्वासात म्हणालो, मी कधीही ढळणार नाही.
[7] होय, परमेश्वरा तुझ्या अनुग्रहाने मला बळकट पर्वतासारखे स्थापले आहे. परंतु जेव्हा तू आपले मुख लपवतोस तेव्हा मी भयभीत होतो.
[8] परमेश्वरा, मी तुझ्याकडे आरोळी केली आणि माझ्या प्रभू कडून अनुग्रह मागितला.
[9] मी मरण पावल्यावर खाली थडग्यात गेलो तर काय लाभ? माती तुझी स्तुती करणार काय? ती तुझी विश्वासयोग्यता सांगेल काय?
[10] हे परमेश्वरा, ऐक आणि माझ्यावर दया कर. हे परमेश्वरा, मला मदत करणारा हो.
[11] तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
[12] म्हणून माझे हृदय तुझी स्तुती गाईल आणि शांत राहणार नाही. हे परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सर्वकाळ स्तुती करीन.