Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:51

[1] “खरोखर हे ऐकूण माझे हृदय थरथरते, ते त्याच्या जागेवरून सरकले आहे.

[2] ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका, देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका.

[3] देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.

[4] त्यानंतर आवाजाची गर्जना होते, देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.

[5] देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.

[6] तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो. ‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’

[7] देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.

[8] म्हणून पशू लपण्यास जातात, आणि त्यांच्या गूहेत राहतात.

[9] दक्षिणेकडून चक्रीवादळ येते उत्तरेकडून थंड वारे येतात.

[10] देवाच्या नि:श्वासाने बर्फ दिल्या जाते आणि पाण्याच्या विस्तार धातूसारखा गोठून जातो.

[11] खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो तो आपल्या विजेचा ढग चोहोकडे पसरवतो.

[12] तो ढगांना सर्व पृथ्वीभर त्याच्या मार्गदर्शनाने पसरण्याची आज्ञा करतो देव जी आज्ञा देतो ती त्यांनी सर्व पृथ्वीच्या पाठीवर पाळावी.

[13] काही वेळा हे सुधारणुक करण्यासाठी असते, काहीवेळा त्यांच्या भूमीसाठी, हे सर्व तो घडवून आणतो, आणि काहीवेळा विश्वासाच्या कराराची कृती असते

[14] ईयोबा, याकडे लक्ष दे, थांब आणि देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्यांचा विचार कर.

[15] देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?

[16] ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव जो ज्ञानाने परिपूर्ण त्याचे आश्चर्यकर्म तू जाणतोस काय?

[17] तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय, दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते.

[18] तो जसे आकाश पसरवतो तसे तू करू शकतो काय? जे आकाश ओतीव आरशाप्रमाणे अढळ आहे?

[19] देवाला आम्ही काय सांगायचे ते तू आम्हांला सांग. अंधारामुळे आम्हास आमचे भाषण रचता येत नाही.

[20] मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय? तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे आहे.

[21] आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो.

[22] उत्तरेकडून सोनेरी वैभव येते, देवाच्या भोवती भितीदायक तेजोवलय असते.

[23] जो सर्वशक्तिमान तो महान आहे आपणाला त्याचा शोध लागत नाही, तो सामर्थ्यवान आहे न्यायाने वागतो. तो लोकांस त्रास देत नाही.

[24] म्हणूनच लोक त्याचे भय धरतात. परंतु देव आपल्या शहाणपणाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकांस मान देत नाही.”

ईयोब — Chapters