Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:39

[1] नंतर ईयोबने उत्तर दिले आणि म्हणाला,

[2] “तुम्ही मला किती वेळ माझ्या जीवाला त्रास देणार आहात? आणि शब्दांनी मला मोडणार आहात?

[3] तुम्ही आतापर्यंत दहा वेळा माझा अपमान केला आहे. तुम्ही कठोरतेने माझ्याबरोबर वागता त्याची लाजही बाळगत नाही

[4] जर खरच मी काही चुक केली असेल तर, ती चुक माझी मला आहे.

[5] तुम्ही माझ्यापेक्षा चांगले आहात एवढेच तुम्हास दाखवायचे आहे, माझी संकटे माझ्या चुकीमुळेच निर्माण झाली आहेत असे तुम्ही (उगीचच) म्हणता.

[6] मग तुम्हास हे माहीती पाहिजे कि, देवानेच मला पकडण्यासाठी जाळे टाकले आहे.

[7] ‘पाहा, असे मी ओरडतो कि मी चुकीचे केले आहे, पण कोणी ऐकले नाही. मी मदतीसाठी जोरात ओरडलो तरी न्याय मिळत नाही.

[8] मी पुढे जाऊ नये म्हणून देवाने माझ्या मार्गात अडथळा आणला. त्याने माझ्या मार्गावर अंधकार पाडला आहे.

[9] देवाने माझी प्रतिष्ठा धुळीला मिळवली. आणि त्याने माझ्या डोक्यावरचा मुकुट काढून घेतला.

[10] माझा सर्वनाश होईपर्यंत देव मला चाऱ्ही बाजूंनी झोडपतो. एखादे झाड मुळासकट उपटून काढावे त्याप्रमाणे त्याने माझ्या आशा उपटून टाकल्या आहेत.

[11] त्याचा क्रोध मला जाळीत आहे, तो मला त्याचा एक शत्रू असे संबोधतो.

[12] त्याचे सैन्य माझ्यावर हल्ला करण्यासाठी पाठवतो ते माझ्याभोवती मोर्चा उभारतात, आणि ते माझ्या डेऱ्याभोवती छावणी टाकतात.

[13] त्याने माझ्या भावांना माझ्यापासुन फार दूर केले आहे, माझ्या सर्वांना दूर ठेवण्याचा अनुभव त्याने मला दिला आहे.

[14] माझे नातलग मला सोडून गेले आहेत, माझ्या जवळचे मित्र मला विसरले आहेत.

[15] माझ्या घरी येणारे पाहुणे आणि माझ्या दासी मला परका आणि परदेशातला समजतात, मी त्यांच्या दृष्टीने उपरा झालो आहे.

[16] जरी मी माझ्या मुखाने याचना केली, माझ्या नोकराला बोलावले, तरी तो मला उत्तर देत नाही,

[17] माझी पत्नी माझ्या श्वासाचा तिरस्कार करते, माझे स्वतःचे भाऊ आणि बहिणी माझा तिरस्कार करतात.

[18] लहान मुलेदेखील मला चिडवतात, जेव्हा मी बोलायला जातो तेव्हा ते माझ्या विरूद्ध बोलतात.

[19] माझे जवळचे मित्रदेखील माझा तिरस्कार करतात. माझे ज्यांच्यावर प्रेम आहे ते लोक देखील माझ्याविरुध्द गेले आहेत.

[20] मी इतका कृश झालो आहे की माझी कातडी हाडांवर लोबंते, मी केवळ दाताच्या कातडीने बचावलो आहे.

[21] माझी दया येऊ द्या, मित्रांनो, तुम्हास माझी दया येऊ द्या! कारण देवाचा हात मजवर पडला आहे.

[22] तुम्ही माझा छळ असा करीत आहात जसे तुम्ही देव आहात. माझ्या देहाला सतत त्रास देण्याचा तुम्हास कंटाळा येत नाही का?

[23] अहो, मी जे बोलतो ते कुणीतरी लिहून ठेवावे! अहो, ते पुस्तकात नमुद करून ठेवायला हवेत.

[24] अहो, मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे.

[25] माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील.

[26] मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.

[27] मी देवाला बघेन, तर मी स्वत:च त्यास पाहीन, माझे डोळे त्यास पाहतील, आणि ते परक्यासारखे राहणार नाही. माझा अतंरात्मा झुरत आहे.

[28] या सगळ्याचे मूळ माझ्याकडेच आढळून आले आहे, म्हणून याचा छळ कोणत्या प्रकारे करावा असे तुम्ही म्हणाल.

[29] तर तुम्हास तलवारीची भीती वाटायला हवी, कारण रागामुळे तलवारीने शासन होते, यावरुन तुम्हास कळेल की न्याय आहे.”

ईयोब — Chapters