[1] “परंतु आता माझ्यापेक्षा लहान माणसे देखील माझी थट्ट करत आहेत, आणि त्याचे वाडवडील ज्यांना मी माझ्या मेंढ्यांची राखण करणाऱ्या कुत्र्यांमध्ये देखील ठेवले नसते.
[2] त्या तरुणांचे वडील मला मदत करण्याच्या दृष्टीने अगदीच निकामी आहेत. ते म्हातारे झाले आहेत आणि दमले आहेत. आता त्यांचे स्नायू टणक आणि जोमदार राहिलेले नाहीत.
[3] ते मृतप्राय झाले आहेत. खायला नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे व म्हणून ते वाळवटांतील धूळ खात आहेत.
[4] ते वाळवटांतील क्षार-झुडपे उपटून घेतात. रतम नावाच्या झाडाची मुळे खातात.
[5] त्यांना दुसऱ्या मनुष्यांपासून दूर ठेवण्यात येते. ते चोर व दरोडेखोर असल्याप्रमाणे लोक त्यांच्यावर ओरडत असतात.
[6] त्यांना नदीच्या कोरड्या पात्रात, डोंगराळ भागातील गुहेत किंवा जमिनीतील विवरात रहावे लागते.
[7] ते झाडाझुडपात आक्रोश करतात. काटेरी झुडपात एकमेकांच्या आश्रयाने राहतात.
[8] ते काडी इतकेही मोल नसलेले लोक आहेत. काहीही नाव नसलेल्या या लोकांस त्यांच्या देशातून हाकलून दिले आहे.
[9] अशा लोकांची मुले माझी चेष्टा करणारी गाणी गातात. त्यांच्या दृष्टीने माझे नाव म्हणजे एक शिवी आहे.
[10] ते तरुण माझा तिरस्कार करतात ते माझ्यापासून लांब उभे राहतात. ते माझ्यापेक्षा उच्च आहेत असे त्यांना वाटते. ते माझ्या तोंडावर थुंकतात सुध्दा.
[11] देवाने माझ्या धनुष्याची प्रत्यंचा काढून घेतली आणि मला दुबळा बनवले. ती तरुण माणसे स्वत:ला न थोपविता रागाने माझ्याविरुध्द वागतात.
[12] ते माझ्या उजव्या भागावर वार करतात. ते माझ्या पायावर वकरुन पाडतात. एखाद्या शहरावर सैन्याने चालून जावे तसे मला वाटते. माझ्यावर हल्ला करून माझा नाश करण्यासाठी माझ्या तटबंदीला मातीचे चढाव बांधतात.
[13] मी पळून जाऊ नये म्हणून ते रस्त्यावर पहारा देतात. माझा नाश करण्यात त्यांना यश मिळते. कुणाच्या मदतीची त्यांना गरज नसते.
[14] ते भिंतीला भोक पाडतात. ते त्यातून आत घुसतात आणि माझ्यावर दरडी कोसळतात.
[15] भीतीने माझा थरकाप झाला आहे. वाऱ्याने सगळे काही उडून जावे त्याप्रमाणे त्यांनी माझी प्रतिष्ठा उडवून लावली आहे. माझी सुरक्षितता ढगांप्रमाणे नाहीशी झाली आहे.
[16] माझे आयुष्य आता गेल्यातच जमा आहे आणि मी लवकरच मरणार आहे. दु:खानी भरलेल्या दिवसानी मला वेढून टाकले आहे.
[17] माझी सगळी हाडे रात्री दुखतात. वेदना मला कुरतडणे थांबवत नाहीत.
[18] देवाने माझ्या कोटाची गळ्याप्रमाणे खेचून माझे कपडे आकारहीन केले आहेत.
[19] देवाने मला चिखलात फेकून दिले आणि माझी राख व कचरा झाला.
[20] देवा, मी मदतीसाठी तुझी याचना करतो पण तू उत्तर देत नाहीस. मी उभा राहतो व तुझी प्रार्थना करतो पण तू माझ्याकडे लक्ष देत नाहीस.
[21] देवा, तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
[22] देवा, तू सोसाट्याच्या वाऱ्याने मला उडवून लावतोस. देवा तू मला वादळात फेकून देतोस.
[23] तू मला माझ्या मृत्यूकडे घेऊन जात आहेस हे मला माहीत आहे. प्रत्येक जिवंत मनुष्यास मरावे हे लागतेच.
[24] परंतु जो आधीच दु:खाने पोळला आहे आणि मदतीची याचना करीत आहे त्यास कोणी अधिक दु:ख देणार नाही.
[25] देवा, मी संकटात सापडलेल्यांसाठी मदतीची याचना केली होती हे तुला माहीत आहे. गरीबांसाठी माझे हृदय तीळ तीळ तुटत होते हे ही तुला माहीत आहे.
[26] परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
[27] मी आतून अगदी मोडून गेलो आहे. माझ्या वेदना कधीच थांबत नाहीत आणि वेदना आणखी येणारच आहेत.
[28] मी सदैव दु:खी असतो, पण मला स्वास्थ्य लाभत नाही. मी लोकांच्यात उभा राहून मदतीसाठी ओरडतो.
[29] कोल्ह्यांना मी भाऊ, आणि शहामृगांना सोबती असा झालो आहे.
[30] माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.
[31] माझे वाद्य शोक गाण्यासाठीच लावले गेले आहे, माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.”