Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 7:33

[1] त्यांनी देवाचा कोश दावीदाने उभारलेल्या तंबूमध्ये आत आणून ठेवला. मग त्यांनी देवापुढे होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिली.

[2] मग होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पिण्याचे समाप्त केल्यावर दावीदाने परमेश्वराच्या नावाने लोकांस आशीर्वाद दिला.

[3] मग त्याने इस्राएलातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला एकएक भाकर, एक मांसाचा तुकडा आणि खिसमिसांची एकएक ढेप वाटून दिली.

[4] मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले.

[5] आसाफ हा पहिल्या गटाचा मुख्य होता. त्याचा गट झांज वाजवीत असे. जखऱ्या दुसऱ्या गटाचा प्रमुख होता. इतर लेवी उज्जियेल, शमीरामोथ, यहीएल, मत्तिथ्या, अलीयाब, बनाया, ओबेद-अदोम, आणि ईयेल. हे सतारी आणि वीणा वाजवत असत.

[6] बनाया आणि याहजिएल हे याजक नेहमी देवाच्या कराराच्या कोशापुढे कर्णे वाजवत असत.

[7] तेव्हा त्यादिवशी पहिल्याने दावीदाने आसाफाला आणि त्याच्या भावांना परमेश्वराची उपकारस्तुती करायला हे गीत गाण्यास दिले.

[8] परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा. राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा.

[9] त्याचे गायन करा, त्याचे स्तुतीगान करा. त्याच्या सर्व आश्र्चर्यकारक कृत्यांविषयी बोला.

[10] त्याच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. जे परमेश्वरास शोधतात त्यांचे अंतःकरण आनंदीत होवो.

[11] परमेश्वरास व त्याच्या सामर्थ्याला शोधा. निरंतर त्याच्या समक्षतेचा शोध करा.

[12] त्याने केलेल्या आश्र्चर्यकारक कृत्यांची आठवण करा. त्याच्या तोंडचे न्याय आणि चमत्काराची कृत्ये यांचे स्मरण करा.

[13] त्याचा सेवक इस्राएल याचे वंशजहो, त्याने निवडलेल्या, याकोबाच्या लोकांनो,

[14] तो परमेश्वर, आमचा देव आहे. त्याचे न्याय सर्व पृथ्वीवर आहेत.

[15] त्याच्या कराराचे सर्वकाळ स्मरण करा. त्याने हजारो पिढ्यांस आज्ञापिलेले त्याचे वचन आठवा.

[16] त्याने अब्राहामाशी केलेल्या कराराची आठवण ठेवा. आणि त्याने इसहाकाशी आपली शपथ वाहिली.

[17] याकोबासाठी त्याने तोच नियम केला. आणि इस्राएलाशी सर्वकाळचा करार केला.

[18] तो म्हणाला, “मी तुला कनान देश तुमच्या वतनाचा वाटा असा देईन.”

[19] मी हे म्हणालो त्यावेळी तुम्ही संख्येने अगदी थोडे होता, फार थोडके होता, परक्या प्रदेशात उपरे असे होता.

[20] तुम्ही एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात भटकत होता. एका राज्यातून दुसऱ्यात जात होता.

[21] पण त्याने कोणाकडूनही त्यांना दु:ख होऊ दिले नाही. त्याने त्यांच्यासाठी राजांना शिक्षा दिली.

[22] तो राजांना म्हणाला, “माझ्या अभिषिक्तांना स्पर्श करू नका. माझ्या संदेष्ट्यांना इजा करू नका.”

[23] पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. त्याचे तारण दिवसेंदिवस सर्वांना सांगा.

[24] त्याच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा सर्व राष्ट्राला त्याच्या आश्चर्यकारक कृत्ये जाहीर सांगा.

[25] परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. आणि सर्व दैवतांपेक्षा त्याचेच भय धरणे योग्य आहे.

[26] कारण सर्व राष्ट्रांतले सगळी दैवते म्हणजे नुसत्या मूर्ती आहेत. पण परमेश्वराने आकाश निर्माण केले.

[27] महिमा आणि प्रताप त्याच्यापुढे आहेत. सामर्थ्य आणि आनंद त्याच्या स्थानी आहेत.

[28] अहो लोकांच्या कुळांनो परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा.

[29] परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.

[30] त्याच्यासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला स्थिर स्थापले आहे. ते हलवता येणार नाही.

[31] पृथ्वी उल्हासित होवो आणि आकाश आनंदित होवो; राष्ट्रामधल्या लोकांस सांगा की, “परमेश्वर राज्य करतो.”

[32] समुद्र आणि त्यातले सर्वकाही आनंदाने गर्जना करो शेत व त्यातील सर्वकाही उत्सव करोत.

[33] अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात तोच पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.

[34] परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

[35] आणि म्हणा, “हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास तार. आम्हास एकत्र करून इतर राष्ट्रापासून सोडीव. आणि तुझ्या पवित्र नावाची उपकारस्तुती करावी आणि तुझ्या स्तुतीने विजयी व्हावे.”

[36] इस्राएलाचा देव परमेश्वर अनादी काळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवादित असो. सर्व लोकांनी “आमेन” म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.

[37] मग आसाफ आणि त्याचे भाऊ यांनी कोशापुढे दररोजच्या कामाप्रमाणे नित्य सेवा करावी म्हणून दावीदाने त्यांना परमेश्वराच्या कराराच्या कोशासमोर ठेवले.

[38] त्या कामात त्यांना मदत करण्यासाठी दावीदाने ओबेद-अदोम यांच्याबरोबर अडुसष्ट नातेवाईकांना त्यामध्ये समाविष्ट केले. यदूथूनाचा पुत्र ओबेद-अदोम, ह्याना होसासोबत, द्वारपाल केले होते.

[39] सादोक याजक आणि त्याच्याबरोबरचे इतर याजक यांनी गिबोन येथील उच्चस्थानी असलेल्या परमेश्वराच्या निवासमंडपासमोर सेवा करण्यास नेमले.

[40] ते दररोज सकाळी आणि संध्याकाळी होमार्पणासाठी असलेल्या वेदीवर परमेश्वरास होमार्पणे करत असत. परमेश्वराच्या नियमशास्त्रात जे लिहिले आहे, त्याने इस्राएलांस आज्ञा केल्याप्रमाणे ते सर्व करावे म्हणून त्यांना नेमले होते.

[41] आणि त्यांच्याबरोबर हेमान, यदूथून व बाकीचे नावे घेऊन निवडलेल्यांनी परमेश्वराची उपकारस्तुती करावी, कारण त्याची दया सर्वकाळ टिकणारी आहे.

[42] हेमान आणि यदूथून यांना झांजा वाजवणे, कर्णे फुंकणे व देवासाठी इतर वाद्यांवर संगीत वाजवणे यांचे ते प्रमुख होते. यदूथूनाचे पुत्र द्वाररक्षक होते.

[43] नंतर सर्व लोक आपल्या घरी परत गेले आणि दावीदही आपल्या घरास आशीर्वाद देण्यासाठी परत गेला.

1 इतिहास — Chapters