Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:17

[1] ही लमुएल राजाची वचने आहेत त्याच्या आईने त्यास शिकवलेली देववाणीः

[2] ऐक, माझ्या मुला? ऐक, माझ्या पोटच्या मुला? ऐक, माझ्या नवसाच्या मुला?

[3] तू आपली शक्ती स्त्रियांना देऊ नको, किंवा आपले मार्ग राजांचा नाश करणाऱ्यास देऊ नको.

[4] हे लमुएला, द्राक्षरस पिणे हे राजांना शोभत नाही, आणि मादक पेय कोठे आहे? असे म्हणणे अधिपतींना शोभत नाही.

[5] ते प्याले तर कायदा काय म्हणतो ते विसरून जातील, नंतर ते गरीबांचा न्याय उलटा करतील.

[6] जो नाशास लागला आहे त्यास मादक पेय दे. आणि खिन्न जिवाला द्राक्षरस दे.

[7] त्याने पिऊन आपले दारिद्र्य विसरावे आणि त्याने आपले सर्व क्लेश विसरावे.

[8] जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.

[9] तू आपले मुख उघड आणि जे योग्य आहे त्याचा योग्य रीतीने न्याय कर, आणि ते गरीब व गरजू आहेत त्यांची बाजू मांडून त्यांना न्याय कर.

[10] हुशार व कार्यक्षम पत्नी कोणाला सापडेल? पण तिचे मोल मौल्यवान खड्यांपेक्षा अधिक आहे.

[11] तिच्या पतीचे मन तिच्यावर भरवसा ठेवते, तो कधीही गरीब होणार नाही.

[12] ती आपल्या आयुष्याच्या सर्व दिवशी त्याच्यासाठी चांगल्या गोष्टी करते आणि अनिष्ट करत नाही.

[13] ती लोकर आणि ताग निवडते, आणि आपल्या हातांनी आनंदाने काम करते.

[14] ती व्यापाऱ्याच्या जहाजासारखी आहे, ती आपले अन्न दुरून आणते.

[15] रात्र गेली नाही तोच ती उठून, आपल्या कुटुंबासाठी अन्न शिजवते, आणि नोकर मुलींना काय करायचे ते काम वाटून देते.

[16] ती शेताविषयी विचार करून ते विकत घेते, ती आपल्या हातांच्या श्रमाने द्राक्षाचे मळे लावते.

[17] ती स्वतःला बलरुप पोशाख घालते, आणि आपले बाहू बळकट करते.

[18] आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते; सर्व रात्री तिचा दिवा विझत नाही.

[19] ती आपला हात चातीला लावते, आणि ती गुंडाळलेला दोरा धरते.

[20] ती आपला हात नेहमी गरीबांसाठी उघडते; ती गरजवंतास देण्यास आपला हात पुढे करते.

[21] आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी वस्त्र पांघरलेले असते.

[22] ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते.

[23] तिचा पती वेशीत, देशातल्या वडिलांमध्ये बसलेला असता त्यास लोक ओळखतात.

[24] ती तागाची वस्त्रे करते आणि ते विकते, ती व्यापाऱ्यांना कमरबंध पुरवते.

[25] बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.

[26] तिच्या मुखातून सुज्ञतेचे बोल निघतात. आणि दयेचा नियम तिच्या जिभेवर आहे.

[27] ती कधीही आळशी नसते; ती आपल्या कुटुंबाच्या मार्गाकडे लक्ष देते, आणि आळसाची भाकर खात नाही.

[28] तिची मुले उठतात आणि ती त्यांना जे काही आनंद देईल ते देते; तिचा पती तिची प्रशंसा करून, म्हणतो,

[29] “पुष्कळ स्त्रियांनी चांगले केले आहे, पण तू त्या सर्वांहून उत्कृष्ट आहेस.”

[30] लावण्य फसवे आहे आणि सौंदर्य हे व्यर्थ आहे, पण तू जी स्त्री परमेश्वराचे भय धरते तिची प्रशंसा होते.

[31] तिच्या हाताचे फळ तिला द्या, आणि तिच्या कृत्यांनी भर वेशीत तिची प्रशंसा होवो.

नीतिसूत्रे — Chapters