Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:53

[1] जर एखाद्या मनुष्यावर खूप दोष असूनही, जो आपली मान ताठ करतो, तो अचानक तुटतो आणि त्यावर काही उपाय चालत नाही.

[2] जेव्हा नीतिमानाची वाढ होते, लोक आनंदित होतात, पण जेव्हा दुर्जन अधिकार चालवतात तेव्हा लोक शोक करतात.

[3] ज्या कोणाला ज्ञानाची आवड आहे तो आपल्या पित्याला आनंदित करतो, पण जो कोणी वेश्येशी सोबत करतो तर तो आपल्या संपत्तीचा नाश करतो.

[4] राजा न्यायाने देश दृढ करतो, पण जो कोणी लाचेची मागणी करतो तो त्याचे वाटोळे करतो.

[5] जो कोणी मनुष्य आपल्या शेजाऱ्याची फाजील स्तुती करतो, तो त्याच्या पावलासाठी जाळे पसरतो.

[6] दुष्ट मनुष्य आपल्या स्वतःच्या पापाने पाशात पडतो, पण नीतिमान गाणे गाऊन आनंदित होतो.

[7] नीतिमान गरिबांच्या वादासाठी विनंती करतो; दुर्जनाला तो समजण्याची बुद्धी नसते.

[8] थट्टा करणारे शहराला पेटवतात; पण सुज्ञजन क्रोधापासून दूर निघून जातात.

[9] जर सुज्ञ मनुष्याचा मूर्खाशी वाद असला तर, मुर्ख रागावला किंवा हसला तरी काही स्वस्थता नसते.

[10] रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.

[11] मूर्ख आपल्या मनातील सारा राग प्रगट करतो, पण शहाणा मनुष्य तो आवरून धरतो आणि शांत राहतो.

[12] जर अधिकाऱ्याने खोट्या गोष्टींकडे लक्ष दिले, तर त्याचे सगळे अधिकारी वाईट होतात.

[13] गरीब मनुष्य आणि जुलूम करणारा या दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे; परमेश्वर दोघांच्याही डोळ्यांना दृष्टी देतो.

[14] जर राजाने गरीबांचा न्याय सत्याने केला, तर त्याचे राजासन सर्वकाळ स्थापित होईल.

[15] छडी आणि सुबोध ज्ञान देतात, पण मोकळे सोडलेले मूल आपल्या आईला लाज आणते.

[16] जेव्हा दुष्ट वाढतात, तेव्हा अपराध वाढतात; पण धार्मिकांना त्यांचे वतन पाहावयास मिळते.

[17] आपल्या मुलाला शिस्त लाव आणि तो तुला विसावा देईल आणि तो तुझा जीव आनंदित करील.

[18] जेथे कोठे भविष्यसूचक दृष्टांत न झाल्यास लोक अनावर होतात, पण जो कोणी नियम पाळतो तो सुखी होतो.

[19] दास शब्दाने सुधारत नाही, कारण जरी त्यास समजले तरी तो प्रतिसाद देणार नाही.

[20] कोणी आपल्या बोलण्यात उतावळा आहे अशा मनुष्यास पाहतोस काय? तर त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा आहे.

[21] जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल.

[22] रागावलेला मनुष्य संकटे आणतो; आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात.

[23] गर्व मनुष्यास खाली आणतो, पण जो कोणी विनम्र आत्म्याचा असतो त्याचा आदर होतो.

[24] जो कोणी चोराचा भागीदार होतो, तो स्वतःचाच शत्रू आहे; ते शपथेखाली ठेवले जातात आणि ते काहीच बोलू शकत नाही.

[25] मनुष्याची भीती पाशरूप होते, पण जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो सुरक्षित राहतो.

[26] पुष्कळजन अधिपतीची मर्जी संपादण्याचा शोध करतात, पण परमेश्वरच लोकांचा न्याय करतो.

[27] अप्रामाणीक मनुष्याचा धार्मिकाला वीट येतो; आणि सरळमार्गी मनुष्याचा दुष्टाला वीट येतो.

नीतिसूत्रे — Chapters