Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:49

[1] माझ्या मुला, माझ्या आज्ञा विसरु नकोस, आणि माझी शिकवण तुझ्या हृदयात ठेव;

[2] कारण त्यापासून दीर्घायुष्य, वयोवृद्धी आणि शांती ही तुला अधिक लाभतील.

[3] विश्वासाचा करार आणि प्रामाणिकपणा तुला कधीही न सोडो, त्यांना एकत्र करून आपल्या गळ्यात बांध, ते आपल्या हृदयाच्या पाटीवर लिहून ठेव.

[4] म्हणजे तुला देवाच्या व मनुष्याच्या दृष्टीने कृपा व सुकीर्ती ही मिळतील.

[5] तू आपल्या सर्व अंतःकरणाने परमेश्वरावर विश्वास ठेव. आणि तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस;

[6] तुझ्या सर्व मार्गात त्याची जाणीव ठेव, आणि तो तुझ्या वाटा सरळ करील.

[7] तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.

[8] हे तुझ्या शरीराला आरोग्य आणि तुझ्या हाडांना सत्व असे होईल.

[9] तुझ्या संपत्तीने आणि आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथमफळाने परमेश्वरास मान दे,

[10] त्याने तुझी कोठारे समृद्धीने भरतील आणि तुझी पिंपे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील.

[11] माझ्या मुला, परमेश्वराची शिस्त तुच्छ मानू नको, आणि त्याच्या शासनाचा द्वेष करू नकोस,

[12] जसा बाप आपल्या आवडत्या मुलाला शिक्षा करतो, तसा परमेश्वर ज्यांच्यावर प्रीती करतो त्यांनाच तो शिस्त लावतो.

[13] ज्या कोणाला ज्ञान सापडले तो सुखी आहे, त्यास ग्रहणशक्ती सुद्धा प्राप्त होते.

[14] ज्ञानापासून जी काय वाढ होते त्याची प्राप्ती परत मिळणाऱ्या रुप्याच्या प्राप्तीपेक्षा चांगली आहे, आणि त्याचे फायदे उत्कृष्ट सोन्यापेक्षा चांगले आहेत.

[15] ज्ञान रत्नांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आणि तुम्ही त्यांची अपेक्षा कराल त्याची तुलना तिच्याशी होऊ शकणार नाही.

[16] तिच्या उजव्या हातात दीर्घ आयुष्य आहे, तिच्या डाव्या हातात संपत्ती आणि सन्मान आहेत.

[17] तिचे मार्ग दयाळूपणाचे मार्ग आहेत, आणि तिच्या सर्व वाटा शांतीच्या आहेत.

[18] जे कोणी तिला धरून राहतात त्यांना ती जीवनाचे वृक्ष आहे, जो कोणी ते धरून ठेवतो तो सुखी आहे.

[19] परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला, परमेश्वराने ज्ञानाने आकाश स्थापिले.

[20] त्याच्या ज्ञानाने खोल जलाशय फुटून उघडले, आणि ढग त्याचे दहिवर वर्षते.

[21] माझ्या मुला, सुज्ञान आणि दूरदर्शीपणा ही सांभाळून ठेव, आणि ती दृष्टीआड होऊ देऊ नकोस.

[22] ते तुझ्या आत्म्याला जीवन देतील. आणि ते तुझ्या गळ्याभोवती घालण्याचे कृपेचे अलंकार होईल.

[23] नंतर तू आपल्या मार्गाने सुरक्षितपणे चालशील, आणि तुझ्या पायाला ठेच लागणार नाही;

[24] तू जेव्हा झोपशील, तेव्हा घाबरणार नाहीस; तू झोप घेशील तेव्हा तुझी झोप गोड होईल.

[25] जेव्हा दुष्टाकडून नाशधूस होईल त्यामुळे, किंवा अचानक येणाऱ्या दहशतीस घाबरू नकोस;

[26] कारण परमेश्वर तुझ्या बाजूस आहे, आणि तुझा पाय पाशात अडकण्यापासून सांभाळील.

[27] ज्यांचे हित करणे योग्य असून ते जेव्हा तुझ्या अधिकारात असल्यास, ते करण्यापासून माघार घेऊ नकोस.

[28] एखादी वस्तू तुझ्याजवळ असता; आपल्या शेजाऱ्यास असे म्हणू नको कि, “जा, आणि पुन्हा ये, आणि उद्या मी तुला देईन.”

[29] तुमच्या शेजाऱ्याला त्रास देण्याची योजना आखू नकोस. जो तुझ्याजवळ राहतो आणि तुझ्यावर विश्वास ठेवतो.

[30] काही कारण नसताना तू एखाद्या मनुष्याशी वाद करू नकोस, जेव्हा त्याने तुझे काहीही वाईट केलेले नाही.

[31] तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.

[32] कारण परमेश्वर कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो; परंतु सरळांना तो त्याच्या आत्मविश्वासात आणतो.

[33] परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो; परंतु तो नितीमानांच्या घराला आशीर्वाद देतो.

[34] तो थट्टा करणाऱ्याची थट्टा करतो, पण तो नम्रजनांस त्याची कृपा देतो.

[35] ज्ञानी सन्मानाचे वतनदार होतील, पण मूर्ख त्यांच्या लज्जेत वर उचलले जातील.

नीतिसूत्रे — Chapters