[1] माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील आणि माझ्या आज्ञा तुझ्याजवळ संग्रह करून ठेवशील,
[2] ज्ञानाचे ऐकशील. आणि ज्ञानाकडे तुझे मन लावशील.
[3] जर तू विवेकासाठी आरोळी करशील, आणि तुझा आवाज त्यासाठी मोठ्याने उच्चारशील;
[4] जर तू रुप्याप्रमाणे त्याचा शोध घेशील, आणि जसे तू गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न करतो तसेच ज्ञानाचा शोध घेशील;
[5] तर तुला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला सापडेल.
[6] कारण परमेश्वर ज्ञान देतो, त्याच्या मुखातून सुज्ञता आणि ज्ञान येतात.
[7] जे त्यास संतोषवितात त्यांना तो पूर्ण ज्ञान देतो, जे प्रामाणिकपणे चालतात त्यांना तो ढाल आहे,
[8] तो न्यायाच्या मार्गाचे रक्षण करतो, आणि जे त्याच्याबरोबर विश्वसनीय आहेत त्याच्या मार्गात टिकून राहतील.
[9] मग धर्म, निती व सात्विकता तुला समजेल, आणि प्रत्येक चांगला मार्ग कळेल.
[10] ज्ञान तुझ्या हृदयात प्रवेश करील, आणि तुझ्या आत्म्याला ज्ञान आनंदित करील.
[11] दूरदर्शीपणा तुझ्यावर पहारा करील, आणि समंजसपणा तुला सांभाळेल.
[12] ते तुला वाईट मार्गापासून सोडविल, कपटी गोष्टी बोलणाऱ्यापासून, सोडवायला तो तुला संभाळील,
[13] ते चांगले मार्ग सोडून, अंधकाराच्या मार्गांनी चालत आहेत.
[14] जेव्हा ते दुष्कर्म करतात ते आनंदित होतात, आणि दुष्कर्माच्या विकृतीवरून ते उल्लासतात.
[15] ते वाकडे मार्ग अनुसरतात, आणि ते फसवणूक करून त्यांच्या वाटा लपवतात.
[16] ज्ञान आणि दूरदर्शीपणा तुला अनितीमान स्त्रीपासून वाचवील, जी स्त्री धाडस करायला बघते आणि खुशामतीच्या शब्दांनी स्तुती करते.
[17] तिने आपला तरुणपणाचा सोबती सोडला आहे, आणि आपल्या देवाचा करार विसरली आहे.
[18] कारण तिचे घर मरणाकडे खाली वाकले आहे. आणि तिच्या वाटा तुला त्या कबरेत असलेल्याकडे घेऊन जातात.
[19] जे सर्व कोणी तिच्याकडे जातात ते पुन्हा माघारी येत नाहीत. आणि त्यांना जीवनाचा मार्ग सापडत नाही.
[20] म्हणून तू चांगल्या लोकांच्या मार्गाने चालावे, व जे योग्य मार्गाने जातात त्याच्यामागे जावे.
[21] कारण योग्य करतात तेच देशात घर करतील, आणि जे प्रामाणिक आहेत तेच त्यामध्ये राहतील.
[22] परंतु दुष्टांना त्यांच्या वतनातून छेदून टाकले जाईल, आणि जे विश्वासहीन त्यांना त्यांच्या वतनापासून दूर नेले जाईल.