[1] बसालेलने बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला; तो अडीच हात लांब, दीड हात रुंद व दीड हात उंच होता.
[2] त्याने तो आतून बाहेरून शुद्ध सोन्याने मढवला आणि त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला.
[3] त्याच्या चाऱ्ही पायांना लावण्यासाठी त्याने सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसऱ्या बाजूला दोन अशा लावल्या.
[4] त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून ते शुद्ध सोन्याने मढवले.
[5] कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांत घातले.
[6] नंतर त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनविले; ते अडीच हात लांब व दीड हात रुंद होते.
[7] बसालेलने सोने घडवून दोन करुब बनवले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले.
[8] त्याने एक करुब एका टोकासाठी व दुसरा करुब दुसऱ्या टोकासाठी बनवला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांना बनवले.
[9] त्या करुबांचे पंख वर असे पसरले होते की त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली होती.
[10] त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते.
[11] त्याने ते शुद्ध सोन्याने मढवले व त्यासभोवती सोन्याचा कंगोरा केला;
[12] आणि त्याने त्याच्यासाठी चार बोटे रुंदीची एक पाळ केली व त्या पाळीस सभोवती सोन्याचा कंगोरा केला.
[13] त्याच्यासाठी सोन्याच्या चार गोल कड्या ओतून तयार केल्या व त्याच्या चाऱ्ही पायावरच्या चार कोपऱ्यांना त्या लावल्या.
[14] या गोल कड्या त्या पाळीजवळ ठेवल्या, त्या मेज उचलावयाच्या दांड्यासाठी होत्या.
[15] मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले;
[16] नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.
[17] त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला; हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली.
[18] या दीपवृक्षाला एका बाजूला तीन व दुसऱ्या बाजूला तीन अशा सहा शाखा होत्या.
[19] प्रत्येक शाखेला बदामाच्या फुलासारख्या तीन तीन वाट्या, बोंडाफुलासह केल्या आणि दुसऱ्या बाजूच्या त्याच्या जोडीच्या प्रत्येक शाखेलाही बदामाच्या फुलांसारख्या तीन तीन वाट्या बोंडाफुलासारख्या केल्या. दीपवृक्षामधून निघालेल्या सहा शाखांची रचना अशीच होती.
[20] दीपवृक्षाच्या दांड्याला बदामाच्या फुलांसारख्या बोडांफुलांसह चार वाट्या होत्या.
[21] या दीपवृक्षामधून निघणाऱ्या सहा शाखांपैकी दोन दोन शाखा आणि त्यांच्याखाली असलेले प्रत्येकी एक बोंड ही एकाच अखंड तुकड्याची होती.
[22] शाखा व फुले असलेला हा संपूर्ण दीपवृक्ष शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यातून घडवलेला होता.
[23] त्याने त्या दीपावृक्षाचे सात दिवे, त्याचे चिमटे व ताटल्या शुद्ध सोन्याच्या केल्या.
[24] त्याने तो दीपवृक्ष व त्याचे बरोबरची सर्व उपकरणे एक किक्कार शुद्ध सोन्याची बनवली.
[25] मग त्याने बाभळीच्या लाकडाची धूपवेदी केली; ती एक हात लांब, एक हात रुंद व दोन हात उंच अशी चौरस होती; तिची शिंगे अंगचीच होती.
[26] त्याने त्या वेदीचा वरचा भाग, तिच्या चाऱ्ही बाजू व तिची शिंगे शुद्ध सोन्याने मढविली व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा केला;
[27] वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालण्याकरता त्याने सोन्याच्या दोन दोन गोल कड्या करून त्या कंगोऱ्यांच्या खाली तिच्या दोन्ही अंगांना लावल्या.
[28] त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढविले.
[29] नंतर त्याने अभिषेकाचे पवित्र तेल आणि सुगंधी द्रव्ययुक्त शुद्ध धूप गांध्याच्या कृतीप्रमाणे केला.