Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 8:21

[1] मोशेने सगळ्या इस्राएल लोकांच्या मंडळीला एकत्र केले; तो त्यांना म्हणाला, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे त्या या;

[2] सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविसाव्याचा शब्बाथ होय, त्या दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही मनुष्यास अवश्य जिवे मारावे.

[3] शब्बाथ दिवशी तुम्ही आपल्या राहत असलेल्या जागेत कोठेही विस्तव पेटवू नये.

[4] मोशे सर्व इस्राएल लोकांच्या मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे;

[5] परमेश्वरासाठी तुम्ही अर्पणे आणावी. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वराकरता सोने, चांदी, पितळ;

[6] निळे, जांभळे व किरमिज रंगाचे सूत, व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस;

[7] लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;

[8] दिव्यासाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धुपासाठी मसाले;

[9] तसेच एफोद व ऊरपट ह्यात खोचण्यासाठी गोमेदमणी आणि इतर रत्ने आणावी.

[10] “तुमच्यापैकी जे कोणी कुशल कारागीर आहेत त्या सर्वांनी येऊन परमेश्वराने जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे, म्हणजे

[11] निवासमंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब, व उथळ्या;

[12] कोश, त्याचे दांडे, दयासन व अंतरपाट,

[13] मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;

[14] प्रकाशासाठी दीपवृक्ष, त्याची उपकरणे व दिवे, आणि दिव्यासाठी तेल;

[15] धूपवेदी व तिचे दांडे, अभिषेकासाठी तेल, सुगंधी द्रव्ययुक्त धूप, निवासमंडपाच्या दारासाठी पडदा;

[16] होमवेदी व तिची पितळेची जाळी, दांडे व तिचे इतर साहित्य, गंगाळ व त्याची बैठक;

[17] अंगणाचे पडदे, त्यांचे खांब व त्यांच्या उथळ्या, आणि अंगणाच्या फाटकासाठी पडदा;

[18] निवासमंडप व अंगण ह्याच्यासाठी मेखा व तणावे,

[19] पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी अहरोन याजकाची व त्याच्या पुत्रांची पवित्र वस्रे.”

[20] मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशेपुढून निघून गेली.

[21] नंतर ज्यांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली, त्या सर्वांनी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळ्या सेवेसाठी आणि पवित्र वस्रांसाठी परमेश्वरास अर्पणे आणली.

[22] ज्यांना मनापासून देण्याची इच्छा झाली त्या सगळ्या स्त्रीपुरुषांनी नथा, कुंडले, अंगठ्या, बांगड्या असे सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने आणले; ही सोन्याची पवित्र अर्पणे परमेश्वरासाठी आणली.

[23] ज्या ज्या पुरुषांच्याकडे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी व तहशाची कातडी होती त्यांनी ते ते आणले.

[24] चांदी व पितळ यांचे अर्पण करणाऱ्या प्रत्येकाने ती अर्पणे परमेश्वरासाठी आणली आणि ज्यांच्याकडे बाभळीचे लाकूड होते त्यांनी ते परमेश्वरास अर्पण केले.

[25] ज्या स्रिया शिवणकाम व विणकाम ह्यात तरबेज होत्या त्या सर्वांनी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड आपल्या हातांनी विणून आणले.

[26] आणि ज्या स्त्रियांच्या अंतःकरणात स्फूर्ती होऊन त्यांना बुध्दी झाली, त्या सर्वांनी बकऱ्याचे केस कातले.

[27] अधिकाऱ्यांनी याजकाचे एफोद व ऊरपट ह्यात जडवण्यासाठी गोमेदमणी व इतर रत्ने आणली.

[28] दिव्याचे तेल व अभिषेकाचे तेल व सुगंधी धुपासाठी मसाला आणला.

[29] परमेश्वराने मोशेला जे करण्याची आज्ञा दिली होती त्या सर्वांसाठी इस्राएल लोकांनी स्वखुशीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली, ज्या ज्या स्त्रीपुरुषांच्या अंतःकरणांत स्फूर्ती झाली त्यांनीही अर्पणे आणली.

[30] तेव्हा मोशे इस्राएल लोकांस म्हणाला, पाहा, परमेश्वराने यहूदा वंशातील ऊरीचा पुत्र म्हणजे हूराचा नातू बसालेल ह्याला नाव घेऊन बोलावले आहे.

[31] आणि त्याने त्यास देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुध्दी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.

[32] तो सोने, चांदी आणि पितळ ह्यांच्यापासून कलाकुसरीचे काम करील.

[33] तो रत्नांना पैलू पाडील. लाकडाचे नक्षीकामही करून अशा सर्व प्रकारची कारागिरीची कामे करील.

[34] परमेश्वराने त्यास आणि दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब, ह्यांच्या ठायी शिक्षण देण्याचे सामर्थ्य ठेवले आहे.

[35] कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व प्रकारचे कसबी काम करणारे व कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.

निर्गम — Chapters