Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 8:34

[1] निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावेत. व त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढावेत.

[2] प्रत्येक पडद्याचे मोजमाप एक सारखेच असावे म्हणजे लांबी अठ्ठावीस हात व रूंदी चार हात असावी;

[3] त्यांपैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;

[4] जेथे एक पडदा दुसऱ्याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी करावीत, तसेच दुसऱ्या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर

[5] एका पडद्याला पन्नास बिरडी कर व दुसऱ्या पडद्याच्या किनारीला पन्नास बिरडी कर. ही बिरडी समोरासमोर असावी;

[6] पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या साहाय्याने ते दोन भाग एकत्र असे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल.

[7] त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे.

[8] हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद अशा मापाचे बनवावेत.

[9] त्यातून पाच पडदे एकत्र जोडावे आणि सहा पडदे एकत्र जोडावे. सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूला दुमडावा.

[10] पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तशीच पन्नास बिरडी करावीत;

[11] नंतर पडदे जोडण्यासाठी पितळेच्या पन्नास गोल कड्या कराव्यात; त्यामुळे दोन भागांना जोडून तंबू अखंड होईल.

[12] या तंबूच्या शेवटच्या पडद्याचा अर्धा भाग पवित्र निवासमंडपाच्या मागच्या टोकाखाली लोंबत राहील.

[13] आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे.

[14] तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्याच्या कातड्याचे एक आच्छादन व दुसरे समुद्र प्राण्याच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.

[15] पवित्र निवासमंडपाला बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्यांचा आधार करावा.

[16] प्रत्येक फळीची लांबी दहा हात व उंची दीड हात असावी.

[17] प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात.

[18] पवित्र निवासमंडपाच्या दक्षिण बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात.

[19] फळ्यांसाठी चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात. प्रत्येक फळीला आत खोल जाण्यासाठी प्रत्येक बाजूस एक बैठक या प्रमाणे चांदीच्या दोन बैठका असाव्यात.

[20] पवित्र निवासमंडपाच्या दुसऱ्या म्हणजे उत्तर बाजूसाठी वीस फळ्या कराव्यात;

[21] आणि त्यांच्यासाठी प्रत्येक फळीखाली दोन बैठका या प्रमाणे चांदीच्या चाळीस बैठका कराव्यात.

[22] पवित्र निवासमंडपाच्या मागच्या बाजूसाठी म्हणजे पश्चिम बाजूसाठी आणखी सहा फळ्या कराव्यात;

[23] आणि मागील बाजूला कोपऱ्यांसाठी दोन फळ्या कराव्यात.

[24] कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूला जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील, दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे.

[25] पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे चांदीच्या सोळा बैठका असतील.

[26] त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व

[27] दुसऱ्या बाजूस पाच अडसर असावेत; आणि त्यांच्या पाठीमागच्या म्हणजे पश्चिम बाजूस पाच अडसर असावेत.

[28] मध्य भागावरील अडसर लाकडांच्या फळ्यातून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जावा.

[29] फळ्या आणि अडसर सोन्याने मढवावेत आणि त्यांना जोडणाऱ्या कड्याही सोन्याच्या कराव्यात.

[30] मी तुला पर्वतावर दाखवल्याप्रमाणे पवित्र निवासमंडप बांधावा.

[31] तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा एक अंतरपट बनवावा आणि त्यावर कुशल कारागिराकडून करुब काढून घ्यावेत.

[32] बाभळीच्या लाकडाचे चार खांब बनवून ते सोन्याने मढवावेत, त्यावर सोन्याच्या आकड्या लावाव्यात आणि ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत;

[33] सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;

[34] परमपवित्रस्थानातील आज्ञापटाच्या कोशावर दयासन ठेवावे.

[35] अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूला असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा.

[36] “पवित्र निवासमंडपाच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा पडदा करून त्यावर वेलबुट्टीदार पडदा बनवावा.

[37] हा पडदा लावण्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत व ते सोन्याने मढवावेत; त्यांच्याकरिता पितळेच्या पाच बैठका बनवाव्यात; हा पडदा अडकविण्यासाठी सोन्याच्या आकड्या कराव्यात.”

निर्गम — Chapters