Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:22

[1] जे सर्व दास म्हणून जुवाखाली आहेत तितक्यानी आपापल्या मालकास सर्व सन्मानास योग्य मानावे यासाठी की देवाचे नाव आणि शिकवण यांची निंदा होऊ नये.

[2] आणि ज्यांचे मालक विश्वास ठेवणारे आहेत त्यांना ते बंधू आहेत म्हणून त्यांचा अपमान करू नये तर अधिक आदराने दास्य करावे कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत या गोष्टी शिकवून बोध कर.

[3] जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही

[4] तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्यास काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात.

[5] मन बिघडलेल्या व खरेपण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा.

[6] वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे.

[7] कारण आपण जगात काहीही आणले नाही आणि आपल्याच्याने या जगातून काहीही बाहेर घेऊन जाता येत नाही.

[8] जर आपणास अन्न, वस्त्र असल्यास तेवढ्याने आपण संतुष्ट असावे.

[9] पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.

[10] कारण पैशाचे प्रेम हे सर्व वाईटाचे मूळ आहे. काही लोक त्याची हाव धरल्याने विश्वासापासून दूर गेले आहेत त्यामुळे त्यांनी स्वतःलाच पुष्कळ दुःख करून घेतले आहे.

[11] हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.

[12] विश्वासासंबंधी चांगले युद्ध कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या सार्वकालिक जीवनाला धरून ठेव. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस,

[13] जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.

[14] आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष रहावे म्हणून ही आज्ञा पाळ.

[15] जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,

[16] ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन.

[17] या युगातील श्रीमंतास आज्ञा कर की, गर्विष्ठ होऊ नका. पैसा जो चंचल आहे त्यावर त्यांनी आशा ठेवू नये, परंतु देव जो विपुलपणे उपभोगासाठी सर्व पुरवतो त्यावर आशा ठेवावी.

[18] चांगले ते करावे, चांगल्या कृत्यात धनवान, उदार व परोपकारी असावे.

[19] जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा.

[20] तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.

[21] ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून बहकून गेले आहेत देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.

तीमथ्याला पहिले पत्र — Chapters