[1] देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
[2] ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.
[3] ते लोकांस लग्न करण्यास मना करतील व जे अन्न विश्वास ठेवणाऱ्यांनी व खरेपण जाणणाऱ्यांनी उपकारस्तुती करून स्वीकारावी म्हणून देवाने अस्तित्वांत आणली ती वर्ज्य करावी असे सांगतील.
[4] तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही.
[5] कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
[6] जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
[7] परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
[8] कारण शरीराच्या कसरतीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.
[9] हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वदा स्वीकारावयास योग्य आहे.
[10] याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.
[11] या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव.
[12] कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
[13] मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
[14] तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको.
[15] या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.
[16] आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.