Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:27

[1] वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर.

[2] तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव.

[3] ज्या विधवा खरोखरीच्या गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर.

[4] पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.

[5] तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते.

[6] पण जी विधवा चैनीत राहते, ती जिवंत असता मरण पावलेली आहे.

[7] त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग

[8] पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.

[9] जी विधवा साठ वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल.

[10] जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.

[11] पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते.

[12] आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला.

[13] आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.

[14] यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.

[15] मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत.

[16] जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील.

[17] जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे.

[18] कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको” आणि “मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”

[19] दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस.

[20] जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.

[21] देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको.

[22] घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.

[23] ह्यापुढे पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी, म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे, थोडासा द्राक्षरस घेत जा.

[24] कित्येक मनुष्यांची पापे उघड असून ती अगोदर न्यायनिवाड्याकरता जातात आणि कित्येकांची मागून जातात.

[25] त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुद्धा कायमची लपवता येत नाहीत.

तीमथ्याला पहिले पत्र — Chapters