Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 5:38

[1] दुसऱ्यांदा येशू सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा मनुष्य होता.

[2] येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी काही लोक त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते.

[3] येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्याला म्हणाला, “लोकांच्या समोर उभा राहा.”

[4] नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा जिवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” परंतु ते गप्प राहीले.

[5] येशूने सर्वांकडे रागाने पाहिले. त्यांच्या मनाच्या कठीणतामुळे तो फार खिन्न झाला. तो त्या मनुष्याला म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर,” त्याने तो लांब केला आणि त्याचा हात बरा झाला.

[6] नंतर परूशी निघून गेले आणि लगेच त्याला ठार करणे कसे शक्य होईल याविषयी हेरोदीयांबरोबर येशूविरूद्ध कट करू लागले.

[7] येशू आपल्या शिष्यांसह गालील सरोवराकडे निघून गेला आणि गालील व यहूदीयातून मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला.

[8] कारण तो करीत असलेल्या कृत्यांविषयी त्यांनी ऐकले व यरुशलेम, इदूमिया, यार्देनेच्या पलीकडच्या प्रदेशातून, सोर व सीदोनच्या आसपासच्या प्रदेशातून मोठा लोकसमुदाय येशूकडे आला.

[9] मग गर्दीमुळे चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने आपल्या शिष्यांस एक छोटी होडी आणावयास सांगितली,

[10] त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी व वाट काढण्यासाठी पूढे रेटीत होते.

[11] जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”

[12] पण त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की, मला प्रगट करू नका.

[13] नंतर येशू डोंगरावर गेला आणि जे त्याला पाहिजे होते त्यांना त्याने स्वतःकडे बोलाविल. व ते त्याच्याकडे आले.

[14] त्याने बारा जण निवडले व त्यांना प्रेषीत हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्याजवळ असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्याला पाठविता यावे.

[15] व त्यांना भुते काढण्याचा अधिकार असावा.

[16] मग येशूने या बारा जणांची निवड केली व जो शिमोन (त्याला पेत्र हे नाव दिले).

[17] जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान (यांना त्याने बेनेरेगेश, ज्याचा अर्थ “गर्जनेचे पुत्र” असा होतो हे नाव दिले.)

[18] अंद्रिया, फिलीप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी

[19] आणि यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर येशूचा विश्वासघात केला.

[20] नंतर येशू घरी गेला आणि पुन्हा एकदा एवढा मोठा लोकसमुदाय जमला की, येशू व त्याचे शिष्य जेवूसुद्धा शकले नाहीत.

[21] त्याच्या कुटुंबातील लोकांनी याविषयी ऐकले तेव्हा ते त्यास आणावयास गेले कारण लोक म्हणत होते की तो वेडा आहे.

[22] यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे. आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”

[23] मग य़ेशूने त्यांना जवळ बोलाविले व बोधकथेच्या साहाय्याने त्याच्याशी बोलू लागला, “सैतानच सैतानाला कसा काढू शकेल?

[24] जर राज्यातच फूट पडली तर ते राज्य टिकू शकत नाही.

[25] आणि घरातच फूट पडली तर ते घर टिकू शकत नाही.

[26] तर मग सैतान स्वतःलाच विरोध करू लागला आणि त्याच्यातच फूट पडली तर तो टिकू शकणार नाही. परंतु त्याचा शेवट होईल.

[27] “खरोखर कोणालाही बलवान मनुष्याच्या घरात शिरून त्याची मिळकत लुटता येणार नाही. प्रथम त्या बलवान माणसाला बांधले पाहिजे, मगच त्याचे घर लुटता येईल.

[28] “मी तुम्हांस खरे सांगतो की, लोकांच्या पापांची व त्यांनी केलेल्या देवाच्या निंदेची त्यांना क्षमा होईल.

[29] पण जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील, त्याची कधीच क्षमा होणार नाही आणि तो मनुष्य सार्वकालिक पापाचा दोषी आहे.”

[30] येशू असे म्हणाला कारण नियमशास्त्राचे शिक्षक म्हणाले की त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा आहे.

[31] नंतर येशूची आई आणि भाऊ तेथे आले. ते बाहेर उभे राहिले आणि कोणाला तरी त्याला बोलवावयास पाठविले.

[32] लोकसमुदाय त्याच्याभोवती जमा झाला होता. लोक येशूला म्हणाले, “पाहा तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.”

[33] त्याने त्यांना उत्तर दिले. “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”

[34] येशूने जे त्याच्याभोवती जमले होते त्यांच्याकडे पाहिले आणि म्हणाला, “हे पाहा माझी आई आणि माझे भाऊ.

[35] जे जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई आहेत.”

मार्क — Chapters