Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 7:26

[1] पहाट होताच मुख्य याजक, वडील, नियमशास्त्राचे शिक्षक व सर्व यहूदी सभा यांनी एक योजना आखली, त्यांनी येशूला बांधले आणि पिलाताच्या ताब्यात दिले.

[2] पिलाताने त्याला विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “तू म्हणतोस तसेच.”

[3] मुख्य याजकांनी पुष्कळ बाबतीत येशूवर आरोप ठेवले.

[4] मग पिलाताने त्याला पुन्हा प्रश्न विचारला, “तू उत्तर देणार नाहीस काय? पाहा, ते किती तरी गोष्टीविषयी तुझ्यावर आरोप ठेवीत आहेत!”

[5] पण तरीही येशूने उत्तर दिले नाही म्हणून पिलाताला आश्चर्य वाटले.

[6] वल्हांडण सणाच्या वेळी ते कोणत्याही एका कैद्याच्या सुटकेची मागणी करीत असत. त्याला पिलात रिवाजा प्रमाणे लोकांसाठी सोडत असे.

[7] बरब्बा नावाचा एक मनुष्य, बंडखोरांबरोबर तुरुंगात होता. या लोकांनी दंगलीमध्ये खून केला होता.

[8] लोक आले आणि पिलाताला तो नेहमी त्यांच्यासाठी करीत असे तसे करायला लावले.

[9] पिलाताने विचारले, “तुमच्यासाठी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”

[10] पिलात असे म्हणाला कारण त्याला माहीत होते की, द्वेषामुळे मुख्य याजकांनी येशूला धरुन दिले होते.

[11] परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांना चिथावले.

[12] परंतु पिलात त्यांना पुन्हा म्हणाला, “तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

[13] ते पुन्हा मोठ्याने ओरडले, “त्याला वधस्तंभावर खिळा!”

[14] पिलाताने पुन्हा विचारले, “का? त्याने कोणता गुन्हा केला आहे?” ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, “ला वधस्तंभावर खिळा!”

[15] पिलाताला लोकांना खूष करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारुन वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.

[16] शिपायांनी येशूला राज्यपालाच्या राजवाड्यात, ज्याला प्रयटोरियम म्हणतात तेथे नेले आणि त्यांनी सैनिकांची एक तुकडीच एकत्र बोलाविली.

[17] त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्याला घातला.

[18] ते त्याला मुजरा करु लागले आणि म्हणू लागले, “हूद्यांच्या राजाचा जयजयकार असो.”

[19] त्यांनी वेताच्या काठीने वारंवार त्याच्या डोक्यावर मारले. त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्याला नमन केले.

[20] त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरुन जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्याला घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेले.

[21] वाटेत त्यांना कुरेने येथील शिमोन नावाचा एक मनुष्य दिसला. तो अलेक्सांद्र व रुफ यांचा पिता होता व आपल्या शेतातून घरी परत चालला होता. मग सैनिकांनी त्याला जबरदस्तीने येशूचा वधस्तंभ वहावयास लावले.

[22] आणि त्यांनी येशूला गुलगुथा म्हणजे (कवटीची जागा) म्हटलेल्या ठिकाणी आणले.

[23] त्यांनी त्याला बोळ मिसळलेला द्राक्षारस दिला परंतु त्याने तो घेतला नाही.

[24] त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले.

[25] त्यांनी त्याला वधस्तंभांवर खिळले तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते.

[26] आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्याचा राजा.” असा लिहिला होता.

[27] त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजविकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.

[28]

[29] जवळून जाणारे लोक त्याची निंदा करीत होते. ते आपली डोकी हलवून म्हणाले, “अरे! मंदिर पाडून ते तीन दिवासात बांधणारा तो तूच ना!

[30] वधस्तंभावरुन खाली ये आणि स्वतःचा बचाव कर.”

[31] तसेच मुख्य याजकांनी, नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूची थट्टा केली आणि एकमेकाला म्हणाले, “त्याने दुसऱ्यांचे तारण केले पण त्याला स्वतःचा बचाव करता येत नाही!

[32] या मशीहाला, इस्त्राएलाचा राजा रिव्रस्त याला वधस्तंभावरुन खाली येऊ द्या मग आम्ही ते पाहू आणि त्याच्यावर विश्वास ठेवू” आणि जे त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळले होते त्यांनी देखील त्याचा अपमान केला.

[33] दुपारची वेळ झाली. सगळ्या भूमीवर अंधार पडला, तो अंधार दुपारी तीन वाजेपर्यंत राहिला.

[34] मग तीन वाजता रिव्रस्त मोठ्याने आरोळी मारुन म्हणाला, “एलोई, एलोई, लमा सबखथनी,” म्हणजे, “माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?”

[35] जवळ उभे असलेल्या काही जणांनी हे ऐकले तेव्हा ते म्हणाले, “ऐका, तो एलीयाला बोलवीत आहे.”

[36] एक जण धावत गेला. त्याने स्पंज आंबेत बुडूवून भरला. काठीवर ठेवला व तो येशूला पिण्यास दिला आणि म्हणाला, “थांबा! एलीया येऊन त्याला खाली उतरवितो की काय हे आपण पाहू.”

[37] मग मोठ्याने आरोळी मारुन येशूने प्राण सोडला.

[38] तेव्हा मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.

[39] येशूच्या पुढे उभे अलेल्या सेनाधिकाऱ्याने जेव्हा त्याची आरोळी ऐकली आणि तो कसा मरण पावला हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, “खरोखर हा मनुष्य देवाचा पुत्र होता.”

[40] तेथे असलेल्या काही स्त्रिया दुरुन पाहत होत्या. त्यांच्यामध्ये मरीया मग्दालिया, धाकटा याकोब आणि योसे यांची आई मरीया व सलोमी या होत्या.

[41] येशू जेव्हा गालीलात होता तेव्हा या स्त्रिया त्याच्या मागे जात व त्याची सेवा करीत असत. याशिवाय त्याच्याबरोबर यरुशलेमेपर्यंत आलेल्या इतर अनेक स्रियाही होत्या.

[42] त्या सुमारास संध्याकाळ झाली होती आणि तो तयारीचा म्हणजे शब्बाथाच्या आधीचा दिवस होता.

[43] योसेफ अरिमथाईकर न्यायसभेचा माननीय सभासद होता व तो सुद्धा देवाचे राज्य येण्याची वाट पाहत होता. तो योसेफ धैर्याने पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले.

[44] येशू इतक्या लवकर कसा मरण पावला याचे पिलाताला आश्चर्य वाटले. मग त्याने सेनाधिकारी बोलाविले आणि त्याना विचारले. येशूला मरुन बराच वेळ झाला की काय?

[45] सेनाधिकाऱ्याकडून त्याने अहवाल ऐकला, तेव्हा त्याने ते शरीर योसेफाला दिले.

[46] मग योसेफाने तागाचे वस्त्र विकत आणले. आणि येशूला वधस्तंभावरुन खाली काढले व त्याला तागाच्या वस्त्रात गुंडाळून ते त्याने खडकात खोदलेल्या कबरेत ठेवले. नंतर त्याने कबरेच्या तोंडावर धोंड बसविली.

[47] येशूला कोठे ठेवले हे मरीया मग्दालिया आणि योसेची आई मरीया हे सर्व बघत होत्या येशूला कुठे ठेवले, हे त्यांनी पाहिले.

मार्क — Chapters