Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 8:33

[1] आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्या स्त्रिया अगदी पहाटेस कबरेकडे आल्या, आणि त्यांनी स्वतः तयार केलेले मसाले आणले.

[2] त्यांना दगड कबरेवरुन लोटलेला आढळला.

[3] त्या आत गेल्या, परंतु त्यांना प्रभु येशूचे शरीर सापडले नाही.

[4] यामुळे त्या अवाक्‌ झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरुष त्यांच्या बाजूला उभे राहिले.

[5] अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे वळविले. ते दोन पुरुष त्यांना म्हणाले, “जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मेलेल्यांमध्ये का करता?

[6] तो येथे नाही; तो उठला आहे! तो गलीलात असताना त्याने तुम्हांला काय सांगितले याची आठवण करा.

[7] तो असे म्हणाला की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्याला वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.”

[8] नंतर स्त्रियांना येशूच्या शब्दाची आठवण झाली.

[9] त्या कबरेपासून परतल्या आणि त्यांनी या सर्व गोष्टींचे वर्तमान अकरा प्रेषितांना व इतर सर्वांना सांगितले.

[10] त्या स्त्रिया मरीया मग्दालिया, योहान्न, आणि याकोबाची आई मरीया ह्या होत्या. त्या आणि इतर स्त्रियांसुद्धा ज्या त्यांच्याबरोबर होत्या, प्रेषितांना या गोष्टी सांगत होत्या.

[11] पण प्रेषितांना त्यांचे सांगणे मूर्खपणाचे वाटले. आणि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही.

[12] पण पेत्र उठला आणि कबरेकडे पळाला. त्याने खाली वाकून पाहिले पण त्याला तागाच्या गुंडाळण्याच्या वस्त्राशिवाय काही आढळले नाही. जे घडले त्याविषयी तो स्वतःशीच आश्चर्य करीत दूर गेला.

[13] त्याच दिवशी त्यांच्यातील दोघे शिष्य यरुशलेमापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते.

[14] ते एकमेकांशी या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी बोलत होते.

[15] ते बोलत असताना आणि या गोष्टींची चर्चा करीत असताना येशू स्वतः आला आणि त्यांच्याबरोबर चालू लागला.

[16] पण त्यांचे डोळे त्याला ओळखण्यापासून बंद करण्यात आले होते.

[17] येशू त्यांना म्हणाला, “चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?” चालता चालता ते थांबले. ते अतिशय दु:खी दिसले.

[18] त्यांच्यातील एकजण ज्याचे नाव क्लयपा होते, तो त्याला म्हणाला, “ह्या दिवसांमध्ये घडलेल्या गोष्टी माहीत नसलेले असे यरुशलेमात राहणारे तुम्ही एकटेच आहात काय?”

[19] येशू त्यांना म्हणाला, “तुमच्या मते कोणत्या गोष्टी?” ते त्याला म्हणाले, “नासरेथकर येशूविषयीच्या सर्व गोष्टी. हाच तो मनुष्य जो आपल्या कृत्यांनी आणि शब्दांनी देवासमोर आणि मनुष्यांसमोर एक महान संदेष्टा झाला.

[20] आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या प्रमुख याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्याला मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले. आणि त्यांनी त्याला वधस्तंभी खिळले.

[21] आम्ही अशी आशा केली होती की, तोच एक आहे जो इस्राएलाची मुक्तता करील. “आणि या सगळ्याशिवाय हे सर्व घडून गेलेल्या गोष्टीला आज तीन दिवस झालेत.

[22] आणि आमच्या परिवारातील काही स्त्रियांनी आम्हांला थक्क केले आहे: आज अगदी पहाटे त्या कबरेकडे गेल्या, परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही.

[23] त्यांनी येऊन आम्हांला सांगितले की, त्यांना देवदूतांचा दृष्टांत घडला आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.

[24] तेव्हा आमच्यातील काही कबरेकडे गेले, आणि स्त्रियांनी जसे सांगितले होते, तसेच त्यांना आढळले, पण त्यांनी त्याला पाहिले नाही.”

[25] मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.

[26] ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?”

[27] आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करुन आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करुन सांगितले.

[28] ज्या खेड्याकडे ते जात होते, त्याच्याजवळ ते आले आणि येशूने असा बहाणा केला की, जणू काय तो पुढे जाणार आहे.

[29] परंतु जास्त आग्रह करुन ते म्हणाले, “आमच्या बरोबर राहा. कारण जवळजवळ संध्याकाळ झालीच आहे. आणि दिवसही जवळजवळ मावळला आहे.” मग तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला.

[30] जेव्हा तो त्यांच्याबोरबर जेवायला मेजासभोवती बसला, त्याने भाकर घेतली आणि उपकार मानले. नंतर त्याने ती मोडली व ती त्यांना तो देऊ लागला.

[31] तेव्हा त्यांचे डोळे उघडले आणि त्यांनी त्याला ओळखले. पण तो त्यांच्यातून अदृश्य झाला.

[32] मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्ट करुन सांगत असताना आपली अंतःकरणे आतल्या आत उकळत नव्हती काय?”

[33] मग ते लगेच उठले, व यरुशलेमेस परत गेले. तेव्हा त्यांना अकरा प्रेषित व त्यांच्याबरोबर असलेले इतर एकत्र जमलेले आढळले.

[34] प्रेषित आणि इतरजण म्हणाले, “खरोखर प्रभु उठला आहे! आणि शिमोनाला दिसला आहे.”

[35] नंतर त्या दोन शिष्यांनी वाटेत काय घडले ते त्याला सांगितले आणि तो भाकर मोडत असताना त्यांनी त्याला कसे ओळखले ते सांगितले.

[36] ते या गोष्टी त्यांना सांगत असतानाच येशू त्यांच्यामध्ये उभा राहिला आणि त्यांस म्हणाला, “तुम्हांस शांति असो.”

[37] ते दचकले आणि भयभीत झाले. त्यांना असे वाटले की, ते भूत पाहत आहेत.

[38] तो त्यांना म्हणाला, “तुम्ही असे अस्वस्थ का झालात? तुमच्या मनात शंका का निर्माण झाल्या?

[39] माझे हात व पाय पाहा. तुम्हाला मी दिसतो तोच मी आहे. मला स्पर्श करा आणि पाहा की, मला आहे तसे हाडमांस भुताला नसते.”

[40] असे बोलून त्याने त्यांस आपले हातपाय दाखवले. तरीही त्यांच्या आनंदामुळे त्यांना ते खरे वाटेना.

[41] ते आश्चर्यचकित झाले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “येथे तुमच्याजवळ खाण्यासाठी काय आहे?”

[42] खरे त्यांनी त्याला भाजलेला माशाचा तुकडा दिला.

[43] त्याने तो घेतला व त्यांच्यासमोर खाल्ला.

[44] तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”

[45] नंतर पवित्र शास्त्र समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.

[46] मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दु:ख भोगावे आणि मेलेल्यांतून तिसऱ्या दिवशी उठावे.

[47] आणि यरुशलेमापासून सुरुवात करुन सर्व राष्ट्रांस माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठवीन. पापक्षमेसाठी पश्चात्तापाची घोषणा करावी.

[48] या गोष्टींचे तुम्ही साक्षी आहात.

[49] आता मी तुम्हांला माझ्या पित्याने जे वचन दिले आहे ते पाठविन. परंतु जोपर्यंत तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने भरले जात नाही तोपर्यंत तुम्ही या शहरातच राहा.”

[50] नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करुन आशीर्वाद दिला.

[51] तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला. आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले.

[52] नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेमाला परतले.

[53] आणि देवाची सतत स्तुति करीत ते मंदिरात राहिले.

लूक — Chapters