Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 10:00

[1] आणि म्हणून हजारो लोकांचा समुदाय जमला होता. इतके लोक जमले होते की, ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोलला: “परुश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे जे ढोंग आहे त्याविषयी जपा.

[2] उघड केले जाणार नाही असे काहीच झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काहीच गुप्त नाही.

[3] यास्तव जे काही तुम्ही अंधारत बोलाल ते उजेडात ऐकले जाईल आणि जे काही तुम्ही कोणाच्या कानात एकांतात सांगाल ते घराच्या छपरावरुन घोषित केले जाईल.”

[4] “परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हांला सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नये, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही.

[5] तुम्ही कोणाची भीति बाळगावी हे मी तुम्हांला सांगतो. तुम्हांला ठार मारल्यांनतर तुम्हांस नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीति धरा. होय, मी तुम्हांस सांगतो त्यालाच भ्या.

[6] “पाच चिमण्या दोन पैशांना विकतात की नाही? आणि त्यातील एकीचाही देवाला विसर पडत नाही.

[7] पण तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील त्याने मोजलेले आहेत. भिऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुम्ही मूल्यवान आहात.”

[8] “प्रत्येक जण जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या मनुष्याला देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील.

[9] परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.

[10] “प्रत्येक मनुष्य जो मनुष्याच्या पुत्राविरुद्ध बोलतो, त्याला क्षमा केली जाईल. परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला क्षमा केली जाणार नाही.

[11] “जेव्हा ते तुम्हांला सभास्थान, सरकार, अधिकारी यांच्यासमोर आणतील तेव्हा तुम्ही काय बोलावे किंवा स्वतःचा बचाव कसा करावा याविषयी आधीच चिंता करीत बसू नका.

[12] कारण तुम्ही काय बोलावे हे पवित्र आत्मा त्यावेळी तुम्हांला शिकवील.”

[13] नंतर लोकसमुदायातील एक जण त्याला म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”

[14] परंतु येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?”

[15] मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”

[16] नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली: “कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले.

[17] तो स्वतःशी विचार करुन असे म्हणाला, ‘मी काय करु, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’

[18] “मग तो म्हणाला, ‘मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन.

[19] आणि मी माझ्या जिवाला म्हणेन, जिवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’

[20] “पण देव त्याला म्हणतो, ‘मूर्खा, जर आज तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’

[21] “जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”

[22] मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “म्हणून मी तुम्हांस सांगतो, स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करु नका. किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करु नका.

[23] कारण अन्नापेक्षा जीव आणि कपड्यापेक्षा शरीर महत्त्वाचे आहे.

[24] कावळ्यांचा विचार करा. ते पेरीत नाहीत व कापणीही करीत नाहीत. त्यांना कोठार नाही व कणगीही नाही. तरीही देव त्याचे पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मोलवान आहात!

[25] चिंता करुन तुम्हांपैकी कोण स्वतःच्या आयुष्यात एका तासाची भर घालू शकेल?

[26] ज्याअर्थी तुम्ही ही लहान गोष्ट करु शकत नाही, तर इतर गोष्टीविषयी चिंता का करता?

[27] “रानफुले कशी वाढतात याचा विचार करा. ते कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत. तरी मी तुम्हांला सांगतो शलमोनानेसुद्धा आपल्या सर्व वैभवात त्यांच्यातील एकासारखाही पोशाख घातला नव्हता.

[28] जर देवाने जे आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाईल अशा त्या रानातील गवताला असा पोशाख घातला आहे, तर तुम्ही जे अल्पविश्वासू त्या तुम्हांला तो कितीतरी अधिक (चांगला) पोशाख घालणार नाही काय!

[29] “आणि तुम्ही काय खावे व काय प्यावे याविषयी खटपट करु नका. या गोष्टीविषयी चिंता करु नका.

[30] कारण जगातील सर्व लोक हे मिळविण्याची खटपट करतात पण या गोष्टींची गरज तुम्हांला आहे, हे तुमच्या पित्याला माहीत आहे.

[31] त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हांला दिल्या जातील.

[32] “लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हांला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समधानाचे वाटते.

[33] तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि गरिबांना पैसे द्या. जुन्या न होणाऱ्या व स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा. जेथे चोर जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करु शकणार नाही.

[34] कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल.

[35] “तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.

[36] लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो व दार ठोठावतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील.

[37] धन्य ते नोकर जे त्यांचा मालक परत आल्यावर त्याला जागे व तयारीत असलेले आढळतील. मी तुम्हांला खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.

[38] तो मध्यरात्री येवो अगर त्यांनतर येवो. जर ते त्याला असे तयारीत आढळतील तर ते धन्य.

[39] “परंतु याविषयी खात्री बाळगा; जर घराच्या मालकाला चोर केव्हा येणार हे माहीत असते तर त्याचे घर त्याने फोडू दिले नसते.

[40] तुम्हीही तयार असा कारण तुम्ही अपेक्षा करणार नाही अशा कोणत्याही क्षणी मनुष्याचा पुत्र येईल.”

[41] मग पेत्र म्हणाला, “प्रभु, तुम्ही ही बोधकथा आम्हांलाच सांगत आहात की सर्वांना?”

[42] तेव्ह प्रभु म्हणाला, “असा कोण शहाणा व विश्वासू कारभारी आहे की, ज्याला प्रभु त्याच्या नोकरांना त्याचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी त्याची नेमणूक करील?

[43] त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर आढळेल तो धन्य.

[44] मी तुम्हांला खरे सांगतो, मालक त्या नोकराला त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील.

[45] “पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार विलंब लावतो.’ व तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो.

[46] ज्या दिवसाची तो वाट पाहत नाही त्या दिवशी त्या नोकराचा मालक येईल व अशा वेळी येईल की ती वेळ त्याला माहीत असणार नाही. आणि तो त्याचे वाभाडे वाभाडे काढील व तो त्याला अविश्वासू लोकांबरोबर ठेवील.

[47] “ज्या नोकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.

[48] परंतु कसलाही वाईट हेतू न बाळगता मालकाला न आवडणारे जर त्याने केले असेल तर त्याला कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.

[49] “मी पृथ्वीवर आग लावण्यास आलो आहे. मला असे वाटते की ती अगोदरच पेटली असती तर किती बरे झाले असते.

[50] माझ्याकडे बाप्तिस्मा आहे व तो मला घ्यावयाचा आहे. आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे!

[51] तुम्हांला असे वाटते का की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करण्यास आलो आहे? नाही, मी तुम्हांला सांगतो मी तुमच्यात फूट पाडण्यासाठी आलो आहे.

[52] मी असे म्हणतो कारण आतापासून घरातील पाच जणात एकमेकाविरुद्ध फूट पडेल. तिघे दोघांविरुद्ध व दोघे तिघांविरुद्ध अशी फूट पडेल.

[53] त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.”

[54] तो लोकसमुदायाला म्हणाला, “तुम्ही जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, ‘पाऊस पडेल’ आणि तेच घडते.

[55] जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता ‘उकाडा होईल’ आणि तसे घडते.

[56] अहो ढोंग्यांने! तुम्ही पृथ्वीवरील व आकाशातील स्थित्यंतरे पाहून अनुमान काढता, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हांला का काढता येत नाही?

[57] “आणि काय योग्य आहे हे तुमचे तुम्ही स्वतःच का ठरवीत नाही?

[58] तुम्ही तुमच्या वाद्याबरोबर न्यायालयात जात असता वाटेतच त्यांच्याशी समेट करा नाही तर तो तुम्हांला न्यायाधीशासमोर नेईल, आणि न्यायाधीश तुम्हांला दंडाधिकाऱ्याच्या स्वाधीन करील. आणि अधिकारी तुम्हांला तुरुंगात टाकील.

[59] मी तुम्हांला सांगतो, तुम्ही पै न पै देईपर्यंत तेथून बाहेर पडू शाकणार नाही.”

लूक — Chapters