[1] प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा,
[2] आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.
[3] जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नावही निघू नये, हे देवाच्या पवित्र लोकांसाठी योग्य नाही.
[4] तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. उलट उपकारस्तुति असावी.
[5] कारण तुम्हांला हे माहीत असावे की: जो मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा अधाशी जे मूर्तिपूजेसारखेच आहे, त्या मनुष्याला देवाच्या आणि ख्रिस्ताच्या राज्यात वतन असणार नाही.
[6] पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये. कारण या कारणांमुळे जे आज्ञा मोडतात, त्यांच्यावर देवाचा क्रोध येणार आहे.
[7] म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका.
[8] मी हे सांगतो कारण एके काळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता, पण आता तुम्ही प्रभूचे अनुयायी म्हणून पूर्ण प्रकाशात आहात. प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.
[9] कारण प्रकाशाची फळे प्रत्येक चांगुलपणात, नीतीमत्वात, आणि सत्यात दिसून येतात.
[10] नेहमी प्रभूला कशाने संतोष होईल हे शोधण्याचा प्रयत्न करा.
[11] आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्यांचे भागीदार होऊ नका. तर उलट, ती उघडकीस आणा.
[12] कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयी बोलणेही लज्जास्पद आहे.
[13] पण जेव्हा सर्व काही प्रकाशाद्वारे उघड होते, तेव्हा प्रत्येक गोष्ट दिसते.
[14] आणि जी प्रत्येक गोष्ट दिसते, ती प्रकाश आहे. म्हणूनच आम्ही असे म्हणतो: “हे झोपलेल्या जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”
[15] म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी सावध असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.
[16] जे चांगल्या संधीचा उपयोग करतात. कारण हे दिवस वाईट आहेत.
[17] म्हणून मूर्खासारखे वागु नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या.
[18] द्राक्षारस पिऊन झिंगल्यासारखे राहू नका. त्यामुळे मनुष्य सर्वच बाबतीत बेताल होतो. उलट आत्म्याने पूर्ण भरले जा,
[19] स्तोत्रे, गीते, आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गाणी गा, आणि आपल्या अंतःकरणात प्रभूसाठी गायने गा.
[20] आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
[21] ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा.
[22] पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा.
[23] कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. ख्रिस्त स्वतःच शरीराचा तारणारा आहे.
[24] पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
[25] पतींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीति करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीति करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
[26] यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे.
[27] यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
[28] याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नींवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो.
[29] कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो.
[30] कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.
[31] शास्त्र सांगते त्याप्रमाणे, “म्हणून मनुष्य त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील. आणि ते दोघे एकदेह होतील.”
[32] हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते.
[33] तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नी नेही पतीचा मान राखाला पाहिजे.