[1] या कारणासाठी मी, पौल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा कैदी आहे.
[2] देवाची कृपा तुमच्यापर्यंत पोचविण्याची व्यास्था करण्याचे काम माझ्यावर सोपवल्याचे तुम्ही जाणता
[3] आणि जशी मी अगोदर तुम्हांला थोडक्यात लिहिली होती ती देवाची गूढ योजना मला प्रकटीकरणाच्या द्वारे कळविण्यात आली.
[4] जर तुम्ही ती वाचाल तर तुम्हांला माझ्या ख्रिस्ताच्या रहरयाविषयीचे पूर्ण ज्ञान होणे शक्य होईल.
[5] मागील पिढ्यांमध्ये हे रहस्य मनुष्यांच्या पुत्रांना सांगण्यात आले नव्हते, जसे आता त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना आत्म्याच्या द्वारे प्रकट करण्यात आले आहे.
[6] हे रहस्य ते आहे की, सुवार्तेद्वारे विदेशी लोक हे यहूदी लोकांबरोबर सहवारसदार आहेत, ते एकाच शरीराचे अवयव आहेत. आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाने दिलेल्या अभिवचनामध्ये सहभागीदार आहेत.
[7] देवाच्या प्रभावी कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
[8] जरी मी देवाच्या सर्व लोकांमध्ये लहानातील लहान आहे तरी मला हे देवाच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता यहूदीतरांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,
[9] आणि रहस्यमय योजना सर्व लोकांना कळविण्यास सांगितली, ज्या देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या, त्याच्याकडे काळाच्या सुरुवातीपासून ही रहस्यमय योजना देवामध्ये लपून अशी राहिली होती.
[10] यासाठी की आता मंडळीद्धारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे.
[11] देवाच्या अनंतकाळच्या हेतूला अनुसरुन जे त्याने आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्णत्वास नेले.
[12] त्या ख्रिस्तामध्ये आम्हांला देवाच्या समक्षतेत आमच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास आहे.
[13] म्हणून, मी प्रार्थितो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या क्लेशामुळे तुम्ही माघार घेऊ नये. कारण हे क्लेश आमचे गौरव आहेत.
[14] -
[15] या कारण्यासाठी ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे, त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो.
[16] मी प्रार्थना करतो की, त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हांला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी.
[17] आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात राहावा. व तुमची मुळे चांगली रुजलेली व प्रीतित मुळावलेली असावी.
[18] यासाठी की, सर्व संतांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हांला सामर्थ्य प्राप्त व्हावे.
[19] आणि ख्रिस्ताची प्रीति जी ज्ञान्यांना मागे टाकते हे कळावे यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे.
[20] आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हांमध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्य आहे,
[21] त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्यासाठी सदासर्वकाळ गौरव असो.