[1] पुन्हा येशू सरोवराच्या किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो सरोवरातील एका तारवात जाऊन बसला आणि सर्व लोक सरोवरकिनारी जमिनीवर होते.
[2] तो त्यास दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि तो त्यांना म्हणाला;
[3] “ऐका, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला;
[4] आणि तो पेरत असताना असे झाले की, काही बी वाटेवर पडले, ते पक्ष्यांनी येऊन खाऊन टाकले.
[5] काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लगेच उगवले.
[6] पण सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्याकारणाने ते वाळून गेले.
[7] काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्यास काही पीक आले नाही.
[8] काही बी चांगल्या जमिनीत पडले ते उगवले, मोठे झाले व त्यास पीक आले; आणि त्याचे तीसपट, साठपट, शंभरपट असे उत्पन्न आले.”
[9] तो म्हणाला, “ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”
[10] तो एकांती असता त्याच्याबरोबर बारा जणांसह जे होते त्यांनी त्यास दाखल्यांविषयी विचारले.
[11] तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते.
[12] यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परंतु त्यांना दिसू नये, आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे, पण समजू नये. नाही तर कदाचित त्यांची माने फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील.”
[13] तो म्हणाला, “हा दाखला तुम्हास समजला नाही काय, तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील?
[14] पेरणारा वचन पेरतो.
[15] वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो.
[16] तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात;
[17] तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.
[18] काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात,
[19] परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते.
[20] चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून त्याचा स्वीकार करतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
[21] आणखी येशू त्यास म्हणाला, “दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना?
[22] प्रत्येक गोष्ट जी झाकलेले आहे ती उघड होईल आणि प्रत्येक गुप्त गोष्ट जाहीर होईल.
[23] ज्याला कान आहेत तो ऐको.”
[24] तो त्यास म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा, ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास मापून देण्यात येईल.
[25] कारण ज्याच्याजवळ आहे त्यास आणखी दिले जाईल व ज्या कोणाजवळ नाही त्याच्यापासून जे आहे तेही काढून घेतले जाईल.”
[26] आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा मनुष्य जमिनीत बी टाकतो.
[27] रात्री झोपी जातो व दिवसा उठतो आणि ते बी रुजते व वाढते हे कसे होते हे त्यास कळत नाही.
[28] जमीन आपोआप पीक देते, पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा.
[29] पीक तयार होते तेव्हा तो त्यास लगेच विळा लावतो कारण कापणीची वेळ आलेली असते.”
[30] आणखी तो म्हणाला, “आपण देवाच्या राज्याची तुलना कशासोबत करू शकतो किंवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे?
[31] ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. जो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यात सर्वात लहान असला तरी,
[32] तो पेरल्यावर उगवून सर्व झाडांत मोठा होतो. त्यास मोठ्या फांद्या येतात आणि आकाशातील पाखरे त्याच्यावर घरटी बांधू शकतात.”
[33] असले पुष्कळ दाखले देऊन, जसे त्यांच्याने ऐकवले तसे, तो त्यांना वचन सांगत असे.
[34] आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. परंतु एकांती तो आपल्या शिष्यांना सर्वकाही समजावून सांगत असे.
[35] त्यादिवशी संध्याकाळ झाल्यावर येशू त्याच्या शिष्यांस म्हणाला, “आपण पलीकडे जाऊ या.”
[36] मग त्यांनी लोकसमुदायाला सोडले आणि तो तारवात होता तसेच ते त्यास घेऊन गेले. त्यांच्याबरोबर इतरही दुसरे तारू होते.
[37] तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले.
[38] परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?”
[39] मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली.
[40] तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?”
[41] परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण?