Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 5:58

[1] देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची ही सुरूवात आहे.

[2] यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील;

[3] अरण्यांत घोषणा करणाऱ्याची वाणी झाली, ‘परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा सरळ करा.’”

[4] त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता.

[5] यहूदीया प्रांत व यरूशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.

[6] योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे.

[7] तो घोषणा करून म्हणत असे, “माझ्यापेक्षाही महान असा कोणीएक माझ्यामागून येत आहे आणि मी त्याच्या वहाणांचा बंद खाली वाकून लवून सोडण्याच्या देखील पात्रतेचा नाही.

[8] मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने करील.”

[9] त्या दिवसात असे झाले की, येशू गालील प्रांतातील नासरेथ नगराहून आला आणि योहानाच्या हातून यार्देन नदीत येशूने बाप्तिस्मा घेतला.

[10] येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले.

[11] तेव्हा आकाशातून वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”

[12] मग आत्म्याने लगेचच त्यास अरण्यांत घालवले.

[13] सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.

[14] योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.

[15] तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”

[16] येशू गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्यास शिमोन व शिमोनाचा भाऊ अंद्रिया हे सरोवरात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते.

[17] येशू त्यांना म्हणाला, “माझ्यामागे या म्हणजे मी तुम्हास माणसे धरणारे करीन.”

[18] मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.

[19] तेथून काहीसे पुढे गेल्यावर येशूला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे तारवात जाळे नीट करताना दिसले.

[20] त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले.

[21] नंतर येशू आणि त्याचे शिष्य कफर्णहूम नगरास गेले, आणि लगेचच येशूने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.

[22] त्याच्या शिकवणुकीने ते चकित झाले, कारण येशू नियमशास्त्राच्या शिक्षकांप्रमाणे शिकवीत नव्हता, तर त्यास अधिकार असल्यासारखा शिकवीत होता.

[23] त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला,

[24] आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.”

[25] परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.”

[26] “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.”

[27] लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!”

[28] येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.

[29] येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला.

[30] शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले.

[31] तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.

[32] संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.

[33] सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले.

[34] त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.

[35] मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.

[36] शिमोन व त्याच्यासोबत असलेले येशूचा शोध करीत होते,

[37] व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.”

[38] तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “आपण जवळपासच्या गावात जाऊ या, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण त्यासाठीच मी निघून आलो आहे.”

[39] मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.

[40] एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.”

[41] येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.”

[42] आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला.

[43] येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले.

[44] आणि म्हटले, “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.”

[45] परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.

मार्ककृत शुभवर्तमान — Chapters