[1] त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी.
[2] ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता.
[3] प्रत्येकजण नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या गांवी गेले.
[4] मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.
[5] व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले.
[6] आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन,
[7] तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
[8] त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते.
[9] अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले.
[10] देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो.
[11] दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे.
[12] तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल.
[13] मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,
[14] “परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.”
[15] मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या.
[16] तेव्हा ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळ ही त्यांना दिसले.
[17] जेव्हा मेंढपाळांनी त्यास पाहिले तेव्हा त्या बाळाविषयी जे सांगितले होते ते त्यांनी सर्वांना जाहीर केले.
[18] मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.
[19] परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या.
[20] नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले.
[21] आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते.
[22] पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे.
[23] म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे.
[24] आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा कबुतरांची दोन पिल्ले यांचा यज्ञ अर्पावा म्हणून त्यांनी त्यास तेथे आणले.
[25] तेव्हा पाहा, यरूशलेम त शिमोन नावाचा कोणीएक मनुष्य होता. तो मनुष्य नीतिमान व भक्तिमान होता. तो इस्राएलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता.
[26] आणि प्रभूच्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय तू मरणार नाही असे पवित्र आत्म्याने त्यास प्रकट केले होते.
[27] आणि तो आत्म्यांत असता परमेश्वराच्या भवनात आला आणि जेव्हा आईवडीलांनी येशू बाळाला, त्याच्याविषयी नियमशास्त्राच्या रीतीप्रमाणे करण्याकरीता, आत आणले,
[28] तेव्हा शिमोनाने येशूला आपल्या हातात घेतले आणि त्याने देवाचा धन्यवाद केला आणि म्हटले,
[29] “हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासास शांतीने जाऊ देत आहेस.
[30] कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे,
[31] ते तू सर्व राष्ट्रांतील लोकांच्या समक्ष तयार केले.
[32] ते परराष्ट्रीयांस प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे.”
[33] त्याच्याविषयी सांगितलेल्या गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले.
[34] आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, पाहा, इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्याविरूद्ध बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे.
[35] यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल.
[36] तेथे हन्ना नावाची एक संदेष्टी राहत होती. ती आशेर वंशातील फनूएलाची मुलगी असून ती फार वृद्ध झाली होती. ती लग्नानंतर आपल्या पतीसमवेत सात वर्षे राहिली.
[37] ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.
[38] तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरूशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
[39] जेव्हा त्यांनी प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पूर्ण केल्यावर, ते गालील प्रांतातील आपले गाव नासरेथ येथे परत गेले.
[40] बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
[41] प्रत्येक वर्षी त्याचे आईवडील वल्हांडण सणासाठी यरूशलेम शहरास जात.
[42] जेव्हा तो बारा वर्षांचा झाला, ते सणाच्या रीतीप्रमाणे वर यरूशलेम शहरास गेले.
[43] मग सणाचे पूर्ण दिवस तेथे घालविल्या नंतर ते घराकडे परत येण्यास निघाले. परंतु मुलगा येशू मात्र यरूशलेमेतच मागे राहिला आणि हे त्याच्या आई-वडीलांना माहीत नव्हते.
[44] तो बरोबर प्रवास करणाऱ्या घोळक्या सोबत असेल असे समजून ते एक दिवसाची वाट चालून गेले. नंतर त्यांनी नातलग व मित्रांमध्ये त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
[45] जेव्हा तो त्यांना सापडला नाही, म्हणून ते यरूशलेम शहरास परत आले आणि तेथे त्यांनी त्याचा शोध घेतला.
[46] असे घडले की, तीन दिवसानंतर तो त्यांना परमेश्वराच्या भवनात सापडला, तो शिक्षकांमध्ये बसून त्यांचे ऐकत होता व त्यांना प्रश्न विचारीत होता.
[47] ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले.
[48] जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.”
[49] येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?”
[50] परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही.
[51] मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या.
[52] येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.