Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 4:23

[1] मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्यामुळे लोक पाप करतील त्या येतीलच पण ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार!

[2] त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे.

[3] स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा.

[4] जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.”

[5] मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढव.”

[6] प्रभू येशू म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल.

[7] तुमच्यापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा दास शेतातून आल्यावर तो त्यास म्हणेल, ‘आत्ताच येऊन जेवायला बस.’

[8] उलट माझे जेवण तयार कर, ‘माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा व पी,’ असे तो त्यास म्हणणार नाही काय?

[9] ज्या गोष्टी करण्याबद्दल तुम्ही नोकराला हुकुम करता ते केल्याबद्दल तुम्ही त्यास धन्यवाद म्हणता का?

[10] तुमच्या बाबतीतही तसेच आहे. जेव्हा तुम्हास करण्यास सांगितलेली सर्व कामे केल्यावर तुम्ही असे म्हणले पाहिजे, आम्ही कोणत्याही मानास लायक नसलेले नोकर आहोत आम्ही फक्त आमचे कर्तव्य केले आहे.”

[11] मग असे झाले की, तो यरूशलेम शहराकडे चालला असता, शोमरोन व गालील प्रांताच्या सीमा यांमधून गेला.

[12] तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले

[13] आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले “येशू, स्वामी, आमच्यावर दया करा,” असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली.

[14] जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले,

[15] जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला.

[16] तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता.

[17] येशू त्यास म्हणाला, “दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत?

[18] या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?”

[19] तो त्यास म्हणाला, “ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

[20] परूश्यांनी येशूला विचारले, देवाचे राज्य केव्हा येईल, येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरुपात येत नाही.

[21] पाहा, ते येथे आहे किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत कारण देवाचे राज्य तर तुमच्यामध्ये आहे.”

[22] शिष्यांना तो म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल. पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही, असे दिवस येतील.

[23] आणि लोक तुम्हास म्हणतील, पाहा, तो तर येथे आहे किंवा पाहा, तो तेथे आहे, तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका.

[24] कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल.

[25] पण पहिल्याने त्याने खूप दुःख भोगावे व या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे.

[26] जसे नोहाच्या दिवसात झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल.

[27] नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते.

[28] त्याचप्रमाणे, लोटाच्या दिवसात झाले तसे होईलः ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते.

[29] पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्यादिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला.

[30] मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशीही असेच घडेल

[31] त्यादिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये.

[32] लोटाच्या पत्नीची आठवण करा.

[33] जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.

[34] मी तुम्हास सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल.

[35] दोन स्त्रिया दळण करत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.

[36] शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्याला ठेवले जाईल.”

[37] शिष्यांनी त्यास विचारले, कोठे प्रभू? येशूने उत्तर दिले, “जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.”

लूककृत शुभवर्तमान — Chapters