Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 8:26

[1] लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. तो बेथानी गावात राहत होता. याच गावात मार्था आणि मरीया राहत होत्या.

[2] ज्या मरीयेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे पाय आपल्या केसांनी पुसले तिचा हा भाऊ होता.

[3] त्या बहिणींनी येशूला निरोप पाठविला की, हे प्रभु ज्याच्यावर तू प्रीति करतोस तो आजारी आहे.

[4] पण येशूने हे ऐकून म्हटले, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. याद्वारे देवाचे गौरव व्हावे यासाठी हा आजार आहे.”

[5] येशू मार्था, मरीया व लाजर यांच्यावर प्रीति करीत असे.

[6] म्हणून तो आजारी आहे हे ऐकल्यावरही तो होता त्याच ठिकाणी दोन दिवस राहिला.

[7] नंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण यहूदीयात परत जाऊ.”

[8] शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी आपणांस दगडमार करु पाहत होते आणि आपण पुन्हा तेथे जात आहात काय?”

[9] येशूने उत्तर दिले, “दिवसाचे बारा तास असतात की नाहीत? जर एखादा दिवसा चालतो, तर त्याला ठेच लागत नाही. कारण तो या जगाचा प्रकाश पाहतो.

[10] पण जर कोणी रात्री चालतो, तर त्याला ठेच लागते कारण त्याच्याकडे प्रकाश नसतो.”

[11] या गोष्टी बोलल्यानंतर तो त्यांना म्हणाला, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे. पण मी त्याला झोपेतून जागे करावयास जात आहे.”

[12] तेव्हा त्याचे शिष्य म्हणाले, “प्रभु, तो झोपी गेला असेल तर बरा होईल.”

[13] पण येशू खरे तर त्याच्या मरणाविषयी बोलला होता. पण तो त्याच्या नेहमीच्या झोपेविषयी बोलत आहे, असे त्यांना वाटले.

[14] तेव्हा येशूने त्यांना स्पष्ट सांगितले, “लाजर मेला आहे.

[15] आणि मी तेथे नव्हतो म्हणून मला तुमच्यामुळे आनंद वाटतो. यासाठी की तुम्ही विश्वास धरावा. आपण त्याच्याकडे जाऊ या.”

[16] तेव्हा दिदुम म्हटलेला थोमा शिष्यांना म्हणाला, “आपणही त्याच्याबरोबर जाऊ या अशासाठी की आपणही त्याच्याबरोबर मरु.”

[17] येशू आल्यावर त्याला समजले की, लाजराला चार दिवसांपूर्वीच कबरेत ठेवण्यात आले आहे.

[18] बेथानी यरुशलेमापासून तीन किलोमीटर अंतरापेक्षा कमी होते.

[19] आणि पुष्कळसे यहुदी मार्था, मरीयेकडे त्यांचा भाऊ मेला याबद्दल सांत्वन करण्यासठी आले होते.

[20] जेव्हा मार्थाने ऐकले की, आपल्या घरी येशू येत आहे तेव्हा ती त्याला भेटायला बाहेर गेली, पण मरीया घरातच राहिली.

[21] “प्रभु” मार्था येशूला म्हणाली, “तू जर येथे असतास तर माझा भाऊ मेला नसता,

[22] पण मला माहीत आहे की, तू जे मागशील ते देव तुला देईल.”

[23] येशू म्हणाला, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”

[24] मार्था म्हणाली. “मला माहीत आहे शेवटच्या दिवशी पुनरुत्थानाच्या वेळेस तो पुन्हा उठेल.”

[25] येशू तिला म्हणाला, “मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल.

[26] आणि जो कोणी जगतो आणि माझ्यावर विश्वास ठेवतो. तो कधीच मरणार नाही. तू यावर विश्वास ठेवतेस काय?”

[27] “होय प्रभु.” ती त्याला म्हणाली, “तू ख्रिस्त आहेस असा मी विश्वास धरते. तू या जगात आलेला असा देवाचा पुत्र आहेस.”

[28] आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.”

[29] जेव्हा मरीयेने हे ऐकले तेव्हा ती लगेच उठली आणि त्याच्याकडे गेली.

[30] आता तोपर्यंत येशू त्या खेड्याच्या आत आला नव्हता. तर मार्था त्याला भेटली, तेथेच अजूनपर्थंत होता.

[31] तेव्हा जे यहूदी तिच्या घरात तिचे सांत्वन करीत होते ते, मरीया लगबगीने उठून बाहेर गेली असे पाहून, ती कबरेकडे शोक करायला गेली असे समजून तिच्यामागे गेले.

[32] मग जेथे येशू होता तेथे मरीया आल्यावर ती त्याला पाहून त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभु, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”

[33] मग येशू तिला रडताना पाहून व तिच्याबरोबर असलेल्या यहूद्यांनाही रडताना पाहून आत्म्यात व्याकुळ झाला व हेलावून गेला.

[34] तो म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते म्हणाले, “प्रभु, या आणि पाहा.”

[35] येशू रडला.

[36] तेव्हा यहूदी म्हणाले, “पहा! त्याला तो किती आवडत होता.”

[37] पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, “ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्या या मनुष्याला लाजराला मरणापासून वाचविता येऊ नये काय?”

[38] मग येशू पुन्हा अंतःकरणात विव्हळ झाला असता कबरेकडे आला. ती गुहा होती, आणि तिच्यावर दगड लोटला होता.

[39] येशूने म्हटले, “हा दगड काढा.” मार्था म्हणाली, “पण प्रभु, लाजर मरुन चार दिवस झाले आहेत, त्याला आता दुर्गंधी येत असेल.” ती मृत लाजराची बहीण होती.

[40] येशूने तिला म्हटले, “जर तू विश्वास धरशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय?”

[41] मग त्यांनी दगड बाजूला केला. तेव्हा येशू वर पाहून म्हणाला, “पित्या, तू माझे ऐकले, म्हणून मी तुझे उपकार मानतो.

[42] आणि तू नेहमीच माझे ऐकतोस हे मला माहीत आहे, पण जो लोकसमुदाय आजूबाजूला उभा आहे त्यांच्यासाठी मी हे बोललो. यासाठी की तू मला पाठविले आहेस यावर त्यांनी विश्वास ठेवावा.”

[43] असे बोलल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लजरा, बाहेर ये.”

[44] मग जो मेला होता तो लाजर जिवंत होऊन बाहेर आला. त्याचे हात पाय वस्त्रांनी बांधले होते व तोंड रुमालाने झाकले होते. येशू लोकांना म्हणाला. “त्याला मोकळे करा आणि जाऊ द्या.”

[45] जे यहूदी मरीयेकडे आले होते, त्यांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

[46] पण त्यांच्यातील काहींनी परुश्यांकडे जाऊन येशूने जे केले होते ते त्यांना सांगितले.

[47] तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, “हा मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.

[48] आम्ही त्याला असेच राहू दिले तर सर्व लोक त्याच्यार विश्वास ठेवतील आणि रोमी येऊन आमचे मंदिर व राष्ट्र दोन्हीही घेतील.”

[49] तेव्हा त्यांच्यातील कयफा नावाची व्यक्ति त्या वर्षी प्रमुख याजक होती. तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच माहिती नाही!

[50] तुम्ही हे लक्षात घेत नाही की, सर्व लोकांसाठी एका माणसाने मरणे हे सर्व राष्ट्राचा नाश होण्यापेक्षा हिताचे आहे.”

[51] तो हे स्वतः होऊन बोलला नाही तर त्यावर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे.

[52] केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की, त्याने देवाच्या पांगलेल्यांना एकत्र करावे, म्हणून तो मरणार आहे.

[53] म्हणून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याची मसलत केली.

[54] यामुळे येशू तेव्हापासून उघडपणे यहूघांमध्ये फिरला नाही. त्याऐवजी तो रानाजवळच्या प्रदेशातील ऐफ्राईम नावाच्या नगरात गेला व तेथे शिष्यांसह राहिला.

[55] तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि सणाअगोदर पुष्कळ लोक आपणांस शुद्ध करायला देशातून वर यरुशलेमेस गेले.

[56] ते येशूचा शोध करीत राहीले, आणि मंदिरात उभे असताना एकमेकास म्हणाले, “तुम्हाला काय वाटते? तो सणाला येणार नाही काय?”

[57] पण मुख्य याजक व परुश्यांनी अशी आज्ञा केली होती की, येशू कोठे आहे हे ज्याला कळेल त्याने त्यांना कळवावे, म्हणजे ते त्याला पकडू शकतील.

योहान — Chapters