Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 4:30

[1] माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो.

[2] माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांवर सोपवून दे.

[3] ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने आपल्या दु:खाचा सहभागी बनून राहा.

[4] सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.

[5] जर कोणी मैदानी स्पर्धेत भाग घेतो तर नियमाप्रमाणे स्पर्धेत घेतल्याशिवाय त्याला विजयाचा मुकुट मिळविता येत नाही.

[6] अति श्रम करणारा शेतकरी हा पहिल्या फळाचा वाटा घेणारा असावा.

[7] मी काय म्हणतो याविषयी तू विचार करावा अशी माझी इच्छा आहे. प्रभु तुला या सर्व गोष्टी समजून घेण्याचे सामर्थ्य देईल.

[8] येशू ख्रिस्त जो मेलेल्यांतून उठला व दाविदाचा वंशज आहे त्याची आठवण करीत राहा. जी सुवार्ता मी सांगतो तिचा हा गाभा आहे.

[9] कारण सुवार्तेमुळे मी दु:ख सहन करतो. येथपर्यंत की, गुन्हेगाराप्रमणे साखळदंडानी मला बांधण्यात आले. पण देवाचे शिक्षण बांधले गेले नाही.

[10] म्हणून, देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व अनंतकाळचे गौरव प्राप्त व्हावे.

[11] येथे एक विश्वसनीय सत्य आहे: जर आम्ही त्याच्यासह मेलेले आहोत. तर त्याच्याबरोबर जीवंतही राहू

[12] जर आम्ही दु:खसहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्याला नाकारले तर तोही आम्हाला नाकारील

[13] जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.

[14] लोकांना या गोष्टीची आठवण करुन देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दांविषयी भांडू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. फक्त जे ऐकतात त्यांचा ते नाश करते.

[15] देवाने पसंत केलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.

[16] पण ऐहिक वादविवाद टाळ कारण ते लोकांना देवापासून अधिकाधिक दूर नेतात.

[17] आणि अशा प्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हुमनाय आणि फिलेत आहेत,

[18] जे सत्यापासून दूर गेले आहेत. ते म्हणतात की, मरणानंतरचे सर्व लोकांचे पुनरुत्थान आधीच झाले आहे व ते काही लोकांच्या विश्वासाचा नाश करीत आहेत.

[19] तथापि देवाने घातलेला भक्कम पाया त्यावर असलेला शिक्का यासह स्थिर राहतो. “प्रभु जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो.” “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने वाईटापासून वळलेच पाहिजे.”

[20] मोठ्या घरात केवळ सोन्याचांदीची भांडी असतात असे नाही तर लाकूड व माती यापासून बनविलेलीही असतात. काही प्रतिष्ठेच्या कामात वापरण्यासाठी असतात तर दुसरी काही कनिष्ठ प्रतीच्या कामी वापरण्यासाठी नेमलेली असतात.

[21] म्हणून जर मनुष्य या अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करील तर तो मानसन्मानस योग्य असे भांडे होईल व धन्यासाठी प्रत्येकसमर्पित कामासाठी पवित्र केलेले व उपयुक्त पात्र होईल.

[22] पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीति आणि शांति यांच्या मागे लाग.

[23] नेहमी मूर्ख व निरर्थक अशा वादविवादापासून दूर राहा. कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात.

[24] देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी दयाधर्माने वागावे तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.

[25] जे त्याला विरोध करतात, त्यांना विनयाने शिक्षण द्यावे या आशेने की देवाने त्यांना पश्चात्ताप करण्यास सहाय्य करावे आणि त्यांना सत्याची ओळख व्हावी.

[26] ते शुद्धीवर यावेत व सैतानाच्या सापळ्यांतून जेथे सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी ठेवले आहे, तेथून त्यांची सुटका व्हावी.

2 तीमथ्थाला — Chapters