Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:25

[1] देवाचे सहकर्मचारी म्हणून आम्ही तुम्हांला विनंति करतो की, जी देवाची कृपा आपल्याला मिळते ती व्यर्थ घालवू नका.

[2] कारण तो म्हणतो, “माझ्या सोयीच्या वेळी मी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवसात मी तुला मदत केली.” मी तुम्हांला सांगतो, देवाच्या “सोयीची वेळ” आताच आहे. आताच “तारणाचा दिवस” आहे.

[3] आमची सेवा दोषी ठरु नये यासाठी आम्ही कोणालाही दोष देत नाही.

[4] उलट सर्व प्रकारच्या परिस्थितीत आम्ही देवाचे सेवक होतो हे आम्ही दाखवून दिले. मग आम्हांला त्रास सोसावा लागो, नाहीतर अडचणी येवोत, छळ होवो नाहीतर वेदना होवोत. छळात, आणि दु:खात

[5] फटके खाण्यात, तुंरुगवासात आणि दंग्यात, कठोर श्रमात, जागून काढलेल्या रात्रीत, भुकेले असताना,

[6] शुद्धतेत, समजूतदारपणात, सहनशीलतेत, आणि दयाळूपणात, पवित्र आत्म्याच्या आणि निर्व्याज प्रीतीमुळे,

[7] सत्य बोलण्यात, आणि देवाच्या सामर्थ्यात, आक्रमक आणि संरक्षक पद्धतीने नीतिमत्वाच्या शस्त्रांसह,

[8] गौरव व अपमानाद्वारे, आमच्याबद्दलच्या वाईट व चांगल्या बातमीने शहाणपणाने, तरीही फसविणारे ठरले गेलेलो.

[9] जरी आम्ही प्रसिद्ध असलो, तरी अप्रसिद्ध असे समजले गेलेलो, मरत असलेले तरी जगत असलेलो, मारलेले तरी अजून ठार न केलेले,

[10] दु:खी तरी नेहमी आनंद करीत, गरीब तरी पुष्कळांना श्रीमंत करणारे, जवळ काही नसलेले तरी सर्व काही जवळ असणारे असे आहोत.

[11] आम्ही मोकळे पणाने तुमच्याशी बोललो, करिंथकरांनो, आणि आमची अंतःकरणे तुमच्यासमोर अगदी पूर्णपणे रीतीने उघडी केली.

[12] आम्ही तुमच्याबद्दल प्रेमभावना ठेवण्याचे थांबवले नाही, पण तुमची आमच्याबद्दलची प्रेमभावना मात्र थबकली आहे.

[13] आपल्यातली देवाणघेवाण चांगली असावी म्हणून मी तुमच्याशी माइया मुलांप्रमाणे बोलतो. तुम्हीही तुमची अंतःकरणे विशाल करा.

[14] जे तुमच्या बरोबरीचे नाहीत त्यांच्याबरोबर एका जुवाखाली एकत्र येऊ नका. नाहीतर नीतिमान व दुष्टपणा यात काय फरक उरला? किंवा प्रकाश व अंधार यात कोणते साम्य आहे?

[15] ख्रिस्त आणि बलियाल यांचा सलोखा कसा होणार? विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्या बरोबर काय सारखेपणा आहे?

[16] देवाचे मंदिर आणि मूर्ति यांच्या मान्यता एक कशा असतील? कारण आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत, ज्याप्रमाणे देवाने म्हटले आहे: “मी त्यांच्याबरोबर राहीन, आणि त्यांच्याबरोबर चालेन, मी त्यांचा देव होईन आणि ते माझे लोक होतील.”

[17] “म्हणून त्यांच्यामधून बाहेर या आणि स्वतःला त्यांच्यापासून वेगळे करा. प्रभु म्हणतो, अशुद्ध वस्तूला स्पर्श करु नका, आणि मी तुम्हांला स्वीकारीन.”

[18] “मी तुम्हांला पिता असा होईन, तुम्ही माझी मुले व कन्या व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभु म्हणतो.”

2 करिंथकरांस — Chapters