Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:50

[1] आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,

[2] आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसविणाऱ्यां कडे लक्ष देतील.

[3] ते लोकांना लग्न करण्यास मना करतात व काही अन्नपदार्थ टाळण्यासाठी सांगतात. जे विश्वासणारे आहेत, व ज्यांना सत्य माहीत आहे अशांनी उपकार मानून घेण्यासाठी देवाने ते निर्माण केले आहेत.

[4] कारण देवाने केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे व जर उपकार मानून आम्ही घेतो तर कोणतीही गोष्ट नाकारु नये.

[5] कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.

[6] तेव्हा बंधू, जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधुभगिनींना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.

[7] परंतु देवहीन गोष्टी, ज्या म्हाताऱ्या स्त्रियांचे लक्षण आहे ते टाळ आणि स्वतःला सतत देवाच्या भक्तीमध्ये गुंतवण्याची सवय ठेव.

[8] कारण शारीरिक शिकवणुकीला अल्प महत्त्व आहे पण देवाच्या सेवेला सर्व प्रकारे महत्त्व आहे, कारण ते सध्याच्या जीवनाविषयी आणि भविष्यातील जीवनाविषयी आशीर्वादाचे अभिवचन आहे.

[9] हे सत्य वचन आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे.

[10] म्हणून आम्ही जास्त काम करतो आणि धडपड करतो. कारण आम्ही, जो सर्व लोकांचा व विशेषेकरून जे विश्वास ठेवतात, अशा विश्वासणाऱ्यांचा विशेषकरुन तारणारा आहे त्या जिवंत देवावर आशा ठेवली आहे.

[11] आज्ञा कर आणि या गोष्टी शिकव.

[12] तू तरुण आहेस म्हणून कोणी तुला तुच्छ मानू नये. त्याऐवजी, विश्वासणाऱ्यांसाठी तू तुझ्या बोलण्याने, तुझ्या वागण्याने, तुझ्या प्रेम दर्शविण्याने, तुझ्या असलेल्या विश्वासाने व तुझ्या शुद्ध जीवनाने त्यांचा आदर्श हो.

[13] मी येईपर्यंत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात, बोध करण्यात व शिकविण्यात स्वतःला वाहून घे.

[14] जेव्हा वडीलजनांनी तुझ्यावर हात ठेवला त्यावेळी भविष्याच्या संदेशाचा परिणाम म्हणून तुला मिळालेली देणगी जी तुझ्यामध्ये आहे, त्याविषयी निष्काळजी राहू नको.

[15] या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यात पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांना दिसून यावी.

[16] आपणांकडे व आपल्या शिकवणुकीकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे तारण करशील.

1 तीमथ्याला — Chapters