Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 4:55

[1] आता, बंधूनो, आध्यात्मिक दानांसबंधी तुम्ही अज्ञान असावे असे मला वाटत नाही.

[2] तुम्हाला माहीत आहे की जेव्हा तुम्ही यहूदीतर होता तेव्हा मूर्तिपूजेकडे तुमचा कल होता.

[3] म्हणून मी तुम्हांला सांगत आहे की, देवाच्या आत्म्याने बोलणारा कोणीही मनुष्य असे म्हणत नाही की, “येशू शापित असो.” आणि पवित्र आत्म्याशिवाय कोणीही “येशू प्रभु आहे,” असे म्हणू शकत नाही.

[4] आध्यात्मिक दाने विभागलेली आहेत पण तोच आत्मा ही विभागणी करतो.

[5] सेवेचे प्रकार आहेत, पंरतु ज्याची आम्ही सेवा करतो तो एकच आहे.

[6] कार्य करण्याचे वेगवेगळे विभाग आहेत पण ह्या सेवा एकाच देवाकडून येतात.

[7] कारण प्रत्येकाच्या फायद्यासाठी एकेकाला आत्म्याचे प्रकटीकरण दिले आहे.

[8] एका व्यक्तीला आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाचे वचन सांगण्याचे शहाणपण दिले जाते. आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याच आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाने बोलण्याचे,

[9] कोणाला त्याच आत्म्याने विश्वास व दुसऱ्याला फक्त त्याच एका आत्म्याद्वारे बरे करण्याचे दान दिले आहे.

[10] दुसऱ्या कोणाला अद्भुत कार्ये करण्याची शक्ति व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ति, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, दुसऱ्या कोणाला वेगवेगळ्या भाषा बोलण्याची, दुसऱ्याला भाषांतर करुन अर्थ सांगण्याची शक्ति दिली आहे.

[11] परंतु तो एकच आत्मा जो त्याच्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देऊन ही सर्व कार्ये पूर्णत्वास नेतो.

[12] कारण ज्याप्रमाणे आपणातील प्रत्येकाला एकच शरीर आणि त्याला अनेक अवयव असतात, आणि तरीही सर्व अवयव जरी ते पुष्कळ असले तरी त्यांचे मिळून एक शरीर बनते. तसाच ख्रिस्तसुद्धा आहे.

[13] जर आपण यहूदी किंवा ग्रीक, गुलाम किंवा स्वतंत्र असून आपणांला एकच आत्मा देह म्हणून दिला आहे. कारण एका आत्म्याने आपणाला एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा दिलेला आहे.

[14] आता एका मानवी शरीरात एकच अवयव असत नाही, तर पुष्कळ असतात

[15] जर पाय म्हणतो, “मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही, होते का?

[16] आणि जर कान म्हणेल, “मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही,” तर तो या कारणासाठी शरीराचा नाही असे होत नाही. होते का?

[17] संबंध शरीरच जर डोळा असते तर आपल्याला ऐकता कसे आले असते?

[18] परंतु प्रत्यक्षात शरीरातील प्रत्येक अवयव देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे ठेवला आहे.

[19] आणि सर्व अवयव जर एकच अवयव असते तर शरीर कोठे असते?

[20] पण असे आहे की, अवयव अनेक आहेत, शरीर मात्र एकच आहे.

[21] डोळा हाताला म्हणू शकत नाही की, “मला तुझी गरज नाही.” किंवा दुसरे उदाहरण द्यायचे तर डोक पायांना म्हणू शकत नाही, “मला तुमची गरज नाही.”

[22] याच्या उलट जे अवयव आपण कमी महत्त्वाचे समजतो, त्यांची आपण अधिक काळजी घेतो.

[23] आणि जे न दाखवण्याजोगे अवयव त्यांना मोठ्या सभ्यतेने वागवतो.

[24] पण आपल्या दाखविता येण्याजोग्या अवयवांना तशी गरज नसते. त्याऐवजी जे अवयव उणे आहेत त्यांना मोठा मान देण्यासाठी देवाने असे शरीर जुळविले आहे,

[25] यासाठी की शरीरात कोणतेही मतभेद नसावेत तर उलट अवयवांनी एकमेकांची काळजी घ्यावी.

[26] जर शरीराचा एक अवयव दुखत असेल तर सर्व अवयव त्याच्याबरोबर दु:ख सोसतात, एका अवयवाचा सन्मान झाला तर सर्व अवयव त्याच्याबरोबर आनंदीत होतात.

[27] म्हणून तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि वैयक्तिकरीत्या अवयव आहात

[28] शिवाय देवाने मंडळीत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, जे चमत्कार करतात ते, ज्यांना आरोग्य देण्याचे दान आहे ते,

[29] जे लोक मदत करतात, जे पुढारीपण करतात व ज्या लोकांना भिन्न भिन्न भाषा बोलण्याचे दान आहे, असे लोक ठेवले आहेत. म्हणजे सर्वच प्रेषित नाहीत, सर्वच संदेष्टे नाहीत, सर्वच शिक्षक नाहीत, सर्वांनाच चमत्कार करण्याची शक्ति नाही.

[30] सर्वांनाच आरोग्य देण्याची दाने नाहीत, सर्वच अन्य भाषेत बोलत नाहीत, सर्वांनाच भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ति नाही.

[31] तथापि आत्म्याच्या अधिक मोठ्या दानांसाठी प्रयत्न करा. आणि आता मी तुम्हांस ह्याहूनही उत्तम मार्ग दाखवितो.

1 करिंथकरांस — Chapters