Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:22

[1] (त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलतो) हे राजकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कुशल कारागिराच्या हातच्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे.

[2] तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, त्यामध्ये मिश्र द्राक्षरसातील उणीव कधीही नसावी. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे.

[3] तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत.

[4] तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दिमिष्काकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे.

[5] तुझे मस्तक कर्मेलासारखे आहे; आणि तुझ्या मस्तकावरचे केस जांभळ्या रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.

[6] अगे प्रिये, आनंदाकरता तू किती सुंदर आहेस व किती गोड आहेस.

[7] तुझी उंची खजुरीच्या झाडासारखी आणि तुझे वक्ष त्याच्या फळांच्या घोसासारखे आहेत.

[8] मी विचार केला, मी खजुरीच्या झाडावर चढेन, त्याच्या फांद्यांना धरीन. तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे.

[9] तुझे चुंबन सर्वात उंची द्राक्षरसाप्रमाणे आहे. तो घशात नीट उतरतो व झोपलेल्यांच्या ओठांवरून सहज गळतो.

[10] (ती तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) मी आपल्या प्रियकराची आहे, त्याचे मन माझ्यावर बसले आहे.

[11] माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ. आपण खेड्यात रात्र घालवू.

[12] आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळिंब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन.

[13] पुत्रदात्रीचा सुवास सुटला आहे, आणि आपल्या दाराजवळ नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आली आहेत. माझ्या प्राणप्रिया ती मी तुझ्यासाठी जतन करून ठेवली आहेत.

गीतरत्न — Chapters