Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 5:41

[1] तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली.

[2] त्याने मला दूर करून प्रकाशाकडे न जाता अंधारात चालण्यास भाग पाडले.

[3] खचितच तो माझ्याविरूद्ध झाला आहे; पूर्ण दिवस त्याने आपला हात माझ्यावर उगारला आहे.

[4] त्यांने माझा देह व त्वचा जीर्ण केली आहे आणि माझी हाडे मोडली आहेत

[5] त्याने माझ्याविरूद्ध विष व दुःखाचे बांधकाम करून मला वेढले आहे.

[6] फार पूर्वी मृत्यू पावलेल्या मनुष्याप्रमाणे त्याने मला काळोखात रहावयास लावले आहे.

[7] त्याने माझ्याभोवती तटबंदी केल्याने त्यातून माझी सुटका होऊ शकत नाही. त्याने माझे बंध अधिक मजबूत केले आहेत.

[8] मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनांचा धिक्कार करतो.

[9] त्याने माझा रस्ता दगडी चिऱ्यांच्या भिंतीने अडवला आहे. त्याने माझा मार्ग वाकडा केला आहे.

[10] तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे.

[11] त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे.

[12] त्याने आपला धनुष्य वाकवला आहे आणि मला त्याच्या बाणांचे लक्ष्य बनविले आहे.

[13] त्याने आपले बाण माझ्या अंतःकरणात घुसवले आहेत.

[14] माझ्या स्वजनामध्येच मी चेष्टेचा विषय; प्रतिदिवशी त्यांचे हास्यास्पद गीत झालो आहे.

[15] त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे.

[16] त्याने खड्यांनी माझे दात तोडले आहेत. त्याने मला राखेत लोटले आहे.

[17] माझ्या जीवनातील शांतीच तू काढून टाकली आहेस; कोणत्याही आनंदाचे मला स्मरण होत नाही.

[18] मी म्हणालो, “माझे बल आणि परमेश्वरावरची माझी आशा नष्ट झाली आहे.”

[19] माझे दुःख, कष्ट, कडू दवणा आणि विष ह्याचे स्मरण कर.

[20] मला माझ्या सर्व त्रासांची आठवण आहे. म्हणूनच मी माझ्यामध्ये नमलो आहे.

[21] पण हे मी माझ्या मनात विचार करतो म्हणून मला आशा वाटते.

[22] ही परमेश्वराची प्रेमदया आहे की आम्ही नाश नाही झालो. त्याची करुणा कधी न संपणारी आहे.

[23] ती प्रत्येक दिवशी नवीन होते; तुझे विश्वासूपण महान आहे.

[24] माझा जीव म्हणतो, “परमेश्वर माझा वतनभाग आहे. म्हणूनच मी त्याच्यावर आशा ठेवीन.”

[25] जे परमेश्वराची वाट पाहतात व जो जीव त्यास शोधतो, त्याला परमेश्वर चांगला आहे.

[26] परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची मुकाट्याने वाट पाहणे हे चांगले आहे.

[27] पुरूषाने आपल्या तरूणपणांत जू वाहावे हे त्यास फार चांगले आहे.

[28] ते परमेश्वराने त्याच्यावर ठेवले आहे म्हणून त्याने एकांती बसावे व स्वस्थ रहावे.

[29] त्याने आपले मुख धुळीत घातल्यास, कदाचित त्यास आशा प्राप्त होईल.

[30] एखाद्यास मारण्यासाठी खुशाल आपला गाल पुढे करून त्यास पूर्ण खजील करावे;

[31] कारण परमेश्वर त्यांचा कायमचा त्याग करणार नाही.

[32] जरी त्याने दुःख दिले तरी तो आपल्या दयेच्या विपुलतेनूसार करुणा करील.

[33] कारण तो आपल्या खुशीने कोणाचा छळ करत नाही आणि मनूष्य संतानास दुःख देत नाही.

[34] पृथ्वीवरील सर्व बंदिवानांना पायाखाली तुडविणे,

[35] परात्पराच्या समोर मनुष्याचे हक्क बुडवणे,

[36] एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसविणे, या अशा गोष्टी परमेश्वराच्या दृष्टी आड आहेत काय?

[37] परमेश्वराने आज्ञा केली नसता ज्याने काही बोलावे आणि ते घडून यावे असा कोणी आहे का?

[38] इष्ट व अनिष्ट ही सर्वश्रेष्ठ देवाच्या मुखातून येत नाहीत काय?

[39] कोणत्याही जिवंत मनुष्याने व पुरूषाने आपल्या पापांच्या शिक्षेबद्दल कुरकुर का करावी?

[40] चला तर आपण आपले मार्ग शोधू आणि तपासू आणि परमेश्वराकडे परत फिरू.

[41] आपण आपले हृदय व आपले हात स्वर्गातील देवाकडे उंचावूया.

[42] आम्ही पाप केले आहे, फितूरी केली आहे. म्हणूनच तू आम्हास क्षमा केली नाहीस.

[43] तू आपणाला क्रोधाने झाकून घेऊन आमचा पाठलाग केला आणि दया न दाखविता आम्हास ठार केलेस.

[44] कोणतीही प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू नये म्हणून तू स्वतःला अभ्रांनी वेढले आहेस.

[45] लोकांमध्ये तू आम्हास कचरा व धूळ ह्यासारखे केलेस.

[46] आमच्या सर्व शत्रूंनी आम्हाविरूद्ध आपले तोंड वासले आहे.

[47] भय व खाच, नाश व विध्वंस ही आम्हावर आली आहे.

[48] माझ्या लोकांच्या कन्येचा नाश झाला आहे, म्हणून माझ्या डोळयांना धारा लागल्या आहेत.

[49] माझे डोळे गळत आहेत व थांबत नाही;

[50] परमेश्वर स्वर्गातून आपली नजर खाली लावून पाहीपर्यंत त्याचा अंत होणार नाही.

[51] माझ्या नगरातील सर्व कन्यांची स्थिती पाहून माझे डोळे मला दुःखी करतात.

[52] निष्कारण शत्रू बनलेल्या लोकांनी पाखरासारखा माझा पाठलाग केला आहे.

[53] गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे.

[54] माझ्या डोक्यावरून पाणी गेले. मी मनाशी म्हणालो, “आता माझा अंत होत आहे.”

[55] परमेश्वरा मी खोल खाचेतून तुझ्या नावाचा धावा केला.

[56] तू माझा आवाज ऐकलास. माझे उसासे व माझ्या आरोळीला आपला कान बंद करू नको.

[57] मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”

[58] परमेश्वरा, माझ्या जीवनातील वादविवादाकरिता तू मध्यस्थी केलीस, तू खंडणी भरून माझा जीव सोडवलास.

[59] परमेश्वरा, माझ्याविषयी जो अन्याय झाला आहे, तो तू बघितला आहेस. तू मला न्याय दे.

[60] माझ्याविरूद्ध रचलेले सुडाचे सर्व कृत्ये; आणि त्यांच्या योजना तू पाहिल्यास.

[61] त्यांनी केलेला माझा उपहास आणि माझ्याविरूध्द आखलेले बेत. परमेश्वरा, तू ऐकले आहेस.

[62] माझ्यावर उठलेले ओठ आणि सारा दिवस त्यांनी माझ्याविरुध्द केलेली योजना तू ऐकली आहे.

[63] परमेश्वरा, त्यांचे बसने व उठने तू पाहा, मी त्यांच्या थट्टेचा विषय झालो आहे.

[64] परमेश्वरा, त्यांना योग्य ते फळ दे. त्यांच्या कार्मांची परतफेड कर.

[65] तू त्यांना हृदयाची कठोरता देशील, तुझा शाप त्यांना देशील.

[66] क्रोधाने तू त्यांचा पाठलाग करशील व परमेश्वराच्या आकाशाखाली तू त्यांचा विध्वंस करशील.

विलापगीत — Chapters