Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 5:55

[1] यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहूदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहूदीया प्रांतात फिरावेसे वाटले नाही.

[2] यहूद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता.

[3] म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत.

[4] जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.”

[5] कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते.

[6] त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही; तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे.

[7] जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.

[8] तुम्ही सणाला वर जा. मी या सणाला आताच वर जात नाही कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही.”

[9] असे त्यांना सांगून तो गालील प्रांतात राहिला.

[10] पण त्याचे भाऊ सणाला वर गेल्यानंतर तोसुध्दा, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.

[11] तेव्हा, यहूदी त्यास सणात शोधीत होते आणि म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?”

[12] आणि लोकांतही त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहेः” दुसरे कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांस फसवतो.”

[13] तरी यहूद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे.

[14] मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला.

[15] तेव्हा यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?”

[16] त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे.

[17] जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल.

[18] जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही.

[19] मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”

[20] लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”

[21] येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता.

[22] मोशेने तुम्हास सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही, पण पूर्वजांपासून आहे.) आणि तुम्ही शब्बाथ दिवशी मनुष्याची सुंता करता.

[23] मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय?

[24] तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”

[25] यावरुन यरूशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला ठार मारायला पाहतात तो हाच ना?

[26] पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्‍यांना कळले आहे काय?

[27] तरी हा कुठला आहे हे आम्हास ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.”

[28] यावरुन येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरीही मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्यास तुम्ही ओळखत नाही.

[29] मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.”

[30] यावरुन ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती.

[31] तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?”

[32] लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परूश्यांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले.

[33] यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे.

[34] तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हास सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.”

[35] यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय?

[36] हा जे म्हणतो की, ‘तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हास सापडणार नाही आणि मी असेन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ हे म्हणणे काय आहे?”

[37] मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे.

[38] जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”

[39] ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.

[40] लोकसमुदायातील कित्येकजण हे शब्द ऐकून म्हणत होते, “खरोखर, हा तो संदेष्टा आहे.”

[41] कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय?

[42] दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल अस शास्त्रलेख म्हणत नाही काय?”

[43] यावरुन त्याच्यामुळे लोकात फूट झाली.

[44] त्यांच्यातील कित्येकजण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत.

[45] मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?”

[46] कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.”

[47] तेव्हा परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हीपण फसलात काय?

[48] अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?

[49] पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.”

[50] पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला.

[51] “एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?”

[52] त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्हीपण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही.”

[53] मग ते सर्वजण आपआपल्या घरी गेले.

योहानकृत शुभवर्तमान — Chapters