Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 3:16

[1] बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो.

[2] लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.

[3] तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.

[4] सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.

[5] आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यामध्येच समाधान माना कारण देवाने असे म्हणले आहे, “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”

[6] म्हणून आपण धैर्याने म्हणू शकतो, “देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार?”

[7] ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.

[8] येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.

[9] विविध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.

[10] ज्या वेदीवरील अन्न खाण्याचा किंवा सहभागी होण्याचा अधिकार मंडपात सेवा करणाऱ्यांनाही नाही, अशी वेदी आपल्याकडे आहे.

[11] यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.

[12] म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले,

[13] म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ.

[14] कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.

[15] म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”

[16] आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.

[17] आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशोब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.

[18] आमच्यासाठी प्रार्थना करा. आमची सद्सदविवेकबुद्धी शुद्ध आहे याविषयी आमची खात्री आहे आणि सर्वबाबतीत जे नेहमी बरोबर आहे तसेच सदैव वागत रहावे अशी आमची इच्छा आहे.

[19] मी तुम्हास विनंती करतो की, देवाने मला लवकरच तुमच्याकडे परत पाठवावे म्हणून कळकळीने प्रार्थना करा.

[20] ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकाळच्या नव्या कराराद्वारे उठवले.

[21] त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.

[22] बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंती तुम्हास करतो.

[23] आपला बंधू तीमथ्य हा तुरुंगातून सुटला आहे. जर तो लवकर माझ्याकडे आला, तर जेव्हा मी तुम्हास भेटायला येईन तेव्हा तो मजकडे येईल.

[24] तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील विश्वास ठेवणारे लोक तुम्हास सलाम सांगतात.

[25] देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.

इब्री लोकांस पत्र — Chapters