Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 5:48

[1] परमेश्वराचे वचन पुन्हा मजकडे आले आणि म्हणाले,

[2] आता तू, मानवाच्या मुला, सोरेविषयी विलाप कर.

[3] आणि “सोरेला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तू समुद्राच्या प्रवेशाद्वाराजवळ वसली आहेस, जी तू पुष्कळ द्वीपांतील व्यापारी लोकांसाठी आहेस. सोरे! तू म्हणाली, मी सुंदरतेत परिपूर्ण आहे.

[4] तुझ्या सीमा समुद्राच्या हृदयात आहेत; बांधणाऱ्यांनी तुला सौंदर्यांने परिपूर्ण केले आहे.

[5] त्यांनी तुझ्या सर्व फळ्या सनीरच्या सरूंनी केल्या आहेत. तुला डोलकाठी करायला त्यांनी लबानोनातून गंधसरु घेतले आहे.

[6] त्यांनी तुझी वल्ही बाशानामधील अल्लोनाच्या झाडाची केली. त्यांनी तुझ्या बैठकीच्या फळ्या कित्तीम बेटातल्या बाक्स लाकडाच्या केल्या असून ती हस्तिदंताने जडलेल्या होत्या.

[7] तुझे शीड, ते तुला निशाण व्हावे म्हणून मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार बारीक सुताचे होते. ते पडद्याचे कापड एलीशा बेटाहून आणलेले निळ्या व जांभळ्या रंगाच्या कापडाचे तुझे छत होते.

[8] जे कोणी सीदोन व अर्वद येथे राहत होते ते तुझ्या नावा वल्हवीत असत. हे सोरे, तुझ्यात सुज्ञ होते. ते तुझे नावाडी होते

[9] तुझ्यामध्ये गबालाची वडील व कुशल कारागीर तुझ्या जहाजाची फुटतूट दुरुस्त करत असत. सर्व समुद्रावरची जहाजे व त्यांचे खलाशी तुझ्या व्यापाराच्या व्यवहारासाठी तुझ्याकडे येत असत.

[10] पारसी, लूदी व पूटी तुझ्या सैन्यात तुझे लढणारे माणसे होती. ते आपली शिरस्त्राणे आणि ढाली तुझ्यामध्ये टांगीत; ते तुझे वैभव दाखवत.

[11] अर्वदची माणसे व हेलेखचे सैनिक सभोवार तुझ्या तटावर असत आणि गम्मादाचे लोक तुझ्या बुरुजांवर असत. ते आपल्या ढाली तुझ्या तटावर चोहोकडे टांगून ठेवीत असत. त्यांनी तुझी सुंदरता पूर्णत्वाला आणली.

[12] तार्शीश तुझा ग्राहक होता कारण प्रत्येक प्रकारचा मालमत्तेचा साठा तुझ्याकडे होता. ते तुझ्या मालाच्या बदल्यात रुपे, लोखंड, कथील व शिसे आणून विकायचा माल घेत असत.

[13] यावान, तुबाल आणि मेशेख तुझ्याबरोबर मनुष्य जीव व पितळेच्या वस्तू ही देऊन तुझ्याशी व्यापार करीत असत. ते तुझा व्यापारी माल हाताळत होते.

[14] तोगार्माचे वंशज तुझ्या मालाबद्दल तुला घोडे, स्वारीचे घोडे व खेचरे देऊन तुझ्याशी व्यापार करीत.

[15] ददानी माणसे पुष्कळ किनारपट्टीवर तुझे व्यापारी होते. व्यापारी माल तुझ्या हातात होता. ते तुला हस्तिदंत व टेंबुरणीचे लाकूड भेट म्हणून परत पाठवत होते.

[16] तुझ्या पुष्कळ उत्पन्नात अराम तुझा व्यापारी होता. ते तुझ्याबद्दल पाचू, जांभळ्या रंगाचे कापड, सुती तलम कापड, पोवळे आणि माणके तुला पुरवत होते.

[17] यहूदा व इस्राएल देश ह्यांचाही तुझ्याबरोबर व्यापार होता. ते तुझ्या मालाबद्दल मिन्नीथाचा गहू, मेवामिठाई, मध, तेल आणि ऊद पुरवत होते.

[18] तुझ्या सर्व प्रचंड संपत्तीचा, तुझ्या सर्व मालाचा हेल्बोनाचा द्राक्षरस व पांढरी लोकर यांनी दिमिष्की तुझा व्यापारी होता.

[19] दान व यावान उसालपासून तुझ्या मालाबद्दल घडीव लोखंड, दालचिनी, ऊसाचा पुरवठा करीत असत. हा तुझ्यासाठी व्यापार झाला.

[20] ददान तुझ्या खोगीराच्या आच्छादनासाठी उत्तम कपड्याचा व्यापारी होता.

[21] अरबस्तान व केदारचे सर्व प्रमुख तुझ्याबरोबर व्यापारी होते. ते तुला कोकरे, एडके आणि बोकड यांचा पुरवठा करीत होते.

[22] शबा व रामा यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते. ते तुझ्या मालाबद्दल सर्व प्रकारचे उत्तम मसाले आणि सर्व प्रकारचे मोल्यवान रत्ने व सोने देऊन तुझ्याशी व्यापार करीत होते.

[23] हारान, कन्ने व एदेन, शबा, अश्शूर व किल्मद यांचे व्यापारी तुझे व्यापारी होते.

[24] ते तुझा माल घेऊन उंची वस्त्रे, जांभळे व वेलबुट्टीचे झगे व उंची वस्त्रांच्या पेट्या व वळलेल्या टिकाऊ दोऱ्या वगैरे व्यापाऱ्याच्या वस्तू ह्यांचा व्यापार करीत होते.

[25] तार्शीशची जहाजे तुझा विकलेला माल वाहतुक करणारे तुझे काफले असे होते. म्हणून तू समुद्राच्या हृदयामध्ये मालवाहू जहाजाप्रमाणे खच्चून भरलेली आहेस.

[26] तुझ्या वल्हेकऱ्यांनी तुला अफाट समुद्रात नेले. पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकले.

[27] तुझी संपत्ती, तुझ्या व्यापारी वस्तू व विकत घेतलेल्या वस्तू; तुझे नाविक, खलाशी आणि जहाज बांधणारे; तुझ्या व्यापाराची देवघेव करणारे व तुझ्यामध्ये असलेली सर्व लढाऊ माणसे व तुझ्यामध्ये असलेला सर्व समुदाय तुझ्या नाशाच्या दिवशी भर समुद्रात पडतील.

[28] तुझ्या खलाशांच्या आरोळीच्या आवाजाने समुद्राकडील नगरे भीतीने थरथर कापतील.

[29] जे कोणी वल्ही हाताळणारे ते सर्व खलाशी व समुद्रावरील प्रत्येक नावाडी आपल्या जहाजावरून उतरून खाली भूमीवर येतील.

[30] ते तुला त्यांचा आवाज ऐकवतील आणि अतीखेदाने ओरडतील; ते आपल्या डोक्यांत धूळ घालतील. राखेत लोळतील.

[31] ते तुझ्यासाठी डोक्याचे केस कापतील. गोणपाट नेसतील. मनात अति खिन्न होऊन तुजसाठी मोठ्याने विलाप करतील.

[32] ते तुझ्यासाठी आक्रोशाने विलाप करून म्हणतील, सोरेसारखी जी समुद्रामध्ये निशब्द झाली आहे, तिच्यासारखी कोणती तरी नगरी आहे काय?

[33] तुझ्या व्यापारांच्या वस्तू समुद्रातून जात असत तेव्हा तू पुष्कळांना तृप्त करीत असत; तुझ्या प्रचंड संपत्तीने आणि आपल्या विकण्याचे पदार्थ फार असल्यामुळे तू पृथ्वीवरील राजांना श्रीमंत केलेस.

[34] पण जेव्हा तू खोल पाण्याने समुद्राकडून मोडून गेलीस तेव्हा तुझ्या विकण्याचा माल व तुझ्यामधील सर्व समुदायही बुडाले.

[35] समुद्रकाठी राहणाऱ्यांना तू घाबरून सोडले आणि त्यांच्या राजांचा दहशतीने थरकाप उडाला आहे. त्यांचे चेहरे कंप पावत आहेत.

[36] लोकांतले व्यापारी तुझा तिरस्कार करतात; तू दहशत अशी झाली आहेस आणि तू पुन्हा कधीच असणार नाहीस.”

यहेज्केल — Chapters