Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:33

[1] म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.

[2] कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.

[3] या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.

[4] उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात;

[5] फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;

[6] शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;

[7] खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून,

[8] गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत,

[9] अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही.

[10] आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.

[11] अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतःकरण मोठे झाले आहे.

[12] आमच्यात तुम्ही संकुचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकुचित झाला आहात.

[13] आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतःकरण मोठे करा. हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो.

[14] विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?

[15] ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?

[16] आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’

[17] आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन.

[18] आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’

करिंथकरांस दुसरे पत्र — Chapters