[1] आसाच्या जागी आता यहोशाफाट यहूदाचा राजा झाला. यहोशाफाट हा आसाचा पुत्र इस्राएलाशी तोंड देता यावे म्हणून यहोशाफाटाने आपले बळ वाढवले.
[2] त्याने यहूदाच्या सर्व तटबंदीच्या नगरांमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्या आसाने काबीज केलेल्या एफ्राइमाच्या नगरांमध्ये तसेच यहूदामध्ये त्याने तटबंदी असलेली ठाणी वसवली.
[3] यहोशाफाटाला परमेश्वराचा पाठिंबा होता कारण लहान वयातच त्याने आपले पूर्वज दावीद यांच्यासारखी सत्कृत्ये केली होती. तो बआल देवतेच्या भजनी लागला नाही.
[4] आपल्या पूर्वजांच्या देवालाच तो शरण गेला. परमेश्वराच्या आज्ञा त्याने पाळल्या इतर इस्राएल लोकांसारखा तो वागला नाही.
[5] परमेश्वराने यहोशाफाटाकरवी राज्य बळकट केले. यहूदाच्या लोकांनी यहोशाफाटासाठी नजराणे आणले त्यामुळे त्यास धन तसेच बहुमान मिळाला.
[6] परमेश्वराच्या मार्गाने वाटचाल करण्यात यहोशाफाटाचे मन रमले. यहूदा प्रांतातील उच्चस्थाने आणि अशेरा देवीच्या मूर्ती त्याने काढून टाकल्या.
[7] आपल्या राज्याच्या तिसऱ्या वर्षात त्याने सरदारांना नगरांमधून यहूदी लोकांस शिकवण द्यायला पाठवले. बेन-हईल, ओबद्या, जखऱ्या, नथनेल आणि मीखाया हे ते सरदार होते.
[8] त्यांच्याबरोबर शमाया, नथन्या, जबद्या, असाएल, शामीरामोथ, यहोनाथान, अदोनीया, तोबीया आणि तोब अदोनीया या लेवीचीही त्याने रवानगी केली. अलीशामा व यहोराम हे याजकही त्याने पाठवले.
[9] हे सरदार, लेवी आणि याजक सर्व लोकांस शिकवले. परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पुस्तक त्यांनी बरोबर घेतले होते. यहूदातील गावोगावी जाऊन ते लोकांस शिकवत गेले.
[10] यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही.
[11] कित्येक पलिष्टयांनी यहोशाफाटासाठी चांदीच्या भेटी आणल्या. काही अरबी शेळ्यामेंढ्या घेऊन येत. त्यांनी असे सात हजार सातशे मेंढेरे आणि सात हजार सातशे बोकड त्यास दिले.
[12] यहोशाफाटाचे सामर्थ्य असे दिवसेंदिवस वाढत चालले. त्याने यहूदात किल्ले आणि कोठारांची नगरे बांधली.
[13] यहूदाच्या नगरात त्याची भरपूर कामे चालत असत. यरूशलेमामध्ये यहोशाफाटाने चांगली बळकट, धीट लढाऊ माणसेही ठेवली.
[14] आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची गणती झालेली होती. ती पुढीलप्रमाणे यहूदातील सरदार असे अदना हा तीन लाख सैनिकांचा सेनापती होता.
[15] यहोहानानाच्या हाताखाली दोन लाख ऐंशी हजार सैनिक होते.
[16] जिख्रीचा पुत्र अमस्या हा त्या खालोखाल दोन लाख योध्दाचा मुख्य होता. त्याने आपणहून परमेश्वराच्या सेवेला वाहून घेतले होते.
[17] बन्यामिनांच्या वंशातील सरदार असे: एल्यादाच्या अखत्यारीत दोन लाख सैनिक धनुष्यबाण आणि ढाल वापरण्यात तरबेज होते. एल्यादा हा एक अतिशय शूर योध्दा होता.
[18] यहोजाबादाकडे युध्दसज्ज असे एक लाख ऐंशी हजार पुरुष होते.
[19] ही सर्व फौज राजा यहोशाफाट याच्या सेवेत होती. याखेरीज यहूदाच्या सर्व नगरांमधील किल्ल्यांवर त्याने माणसे नेमली होती.