[1] बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही.
[2] कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.
[3] “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत.
[4] बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
[5] कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात; आपण रात्रीचे व अंधाराचे नाही.
[6] ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे.
[7] झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात.
[8] परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे; विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
[9] कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
[10] प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
[11] म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात.
[12] आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
[13] आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा.
[14] आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा.
[15] आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
[16] सदोदित आनंद करा.
[17] नित्य प्रार्थना करा.
[18] प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
[19] पवित्र आत्म्याला विझवू नका.
[20] संदेशाचा उपहास करू नका.
[21] सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
[22] वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.
[23] आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
[24] तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
[25] बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
[26] सर्व बंधूंना पवित्र प्रीतीने नमस्कार सांगा.
[27] मी तुम्हास प्रभूची आज्ञा म्हणून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवा.
[28] आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.